‘आपण ‘गूगल’ उघडून तेथे ‘गोवा’ असे टंकलेखन केले आणि त्यानंतर आपल्यासमोर जे येते, त्यामध्ये सर्वत्र समुद्रकिनार्यांची छायाचित्रे, आकर्षक पर्यटनस्थळे, हॉटेल्स, एक-दोन प्रसिद्ध चर्चेस, इतकेच नव्हे, तर फोंडा येथील साफा मशीदसुद्धा प्राधान्याने पहायला मिळते आणि पुढे खाली खाली पहात येत असतांना शेवटी १-२ मंदिरांची छायाचित्रे दिसली. गोव्याच्या माहितीत सर्वप्रथम परिच्छेदात गोवा, म्हणजे उत्तम पर्यटन, समुद्रकिनारे आणि पोर्तुगीज संस्कृती असे काहीसे वाचायला मिळाले. यावरून लक्षात आले, ‘आजही गोव्याची खरी ओळख लोकांना नाहीच !’
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘गोव्यात येण्यापूर्वी त्याच्याविषयी ऐकलेली माहिती, गोव्याचा गौरवशाली इतिहास आणि गोव्यातील मंदिरांची अन्य धार्मिक वैशिष्ट्ये’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
(भाग ३)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/958967.html
६. गोव्याचे ‘पर्यटन’ याऐवजी ‘तीर्थाटन’ होण्यासाठी सरकार आणि जनता यांचे प्रयत्न महत्त्वाचे !
गोव्याचे सुंदर धार्मिक रूप डोळ्यांसमोर आल्यावर कुणाला येथे यावेसे वाटणार नाही ? आज गोव्यात कितीतरी संप्रदाय, मठ, आश्रम इत्यादी माध्यमातून लोक साधनारत आहेत. त्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत गोवाही एक मोठे आध्यात्मिक क्षेत्र आहे. आज ज्या पर्यटकांना गोव्याची मंदिरेही सुंदर आहेत, हे आधी कुणीतरी सांगितले असते किंवा येणारे पर्यटक मुळातच धार्मिक असतील, तर ते आवर्जून मंदिरे पहाण्यासाठीच येतात; परंतु त्यांची टक्केवारी अत्यल्प असते. त्यामुळे ‘कॅसिनो’, ‘मद्य’, पंचतारांकित उपाहारगृहे, यांतून सरकारला महसूल मिळतो, हे जरी मान्य केले, तरीही त्या संबंधीच्या विज्ञापनांच्या जोडीला गोव्यातील प्रसिद्ध मंदिरांचे मोठे फ्लेक्स किंवा होर्डिंगही वाटेत लावले, तर गोव्यात प्रथम येणार्या लोकांना येथे सुंदर प्राचीन भव्य मंदिरेही आहेत, हे सहज लक्षात येऊ शकेल, यादृष्टीने सरकारने प्रयत्न करायला हवेत.
आज गोव्याची प्रतिमा बाहेरील राज्यांत समुद्रकिनारे, दारू, अमली पदार्थ, स्त्रीदेह व्यापार या गोष्टींच्या भोवतीच सीमित आहे, हे लोकप्रतिनिधीही मान्य करतात. मध्यंतरी गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे एका कार्यक्रमात म्हणाले, ‘‘सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संस्थांमुळे आता गोव्याची ओळख पालटत आहे. आता लोक अध्यात्म शिकण्यासाठी गोव्यात येत आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे.’’
आता धार्मिक संस्थांच्या जोडीला सरकारनेही यादृष्टीने प्रयत्न चालू केले आहेत. गोव्यात पर्यटन खात्याने ‘एकादश तीर्थ योजना’ चालू केली आहे. या योजनेत पर्यटकांना ११ प्रसिद्ध मंदिरांचे दर्शन घडवण्यात येणार आहे. अनेक तीर्थक्षेत्रांना गोव्याशी थेट जोडण्याचे कामही चालू आहे. असे असले, तरी पर्यटनाच्या विज्ञापनांच्या तुलनेत हे प्रयत्न न्यून आणि तोकडे आहेत. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथील राज्य सरकारांनी ज्याप्रमाणे केवळ ‘पर्यटन’ असा विचार न करता ‘तीर्थाटन’ या भूमिकेतून प्रसिद्ध मंदिरे अन् त्यांचा परिसर यांचा जो विकास केला, त्यातून त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा लाभ झाल्याचे स्वतः उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले आहे. आज ‘उत्तरप्रदेश कशासाठी प्रसिद्ध आहे ?’, असे ‘गूगल’वर शोधल्यावर आपल्याला प्राधान्याने मंदिरांची छायाचित्रे दिसतात. याच भूमिकेतून गोव्याचेही केवळ ‘पर्यटन’ असे न करता ‘तीर्थाटन’ व्हायला हवे, तर सध्या असलेली गोव्याची मलीन प्रतिमा चांगली होऊन लोक तीर्थाटनासाठी येथे येतील, यात शंका नाही. पर्यटनाच्या जोडीला तीर्थाटन झाल्यास येथील अर्थव्यवस्थेलाही नक्कीच हातभार लागेल. यादृष्टीने सरकारने प्रयत्न करावेत आणि त्यासाठी जनतेनेही सरकारकडे आग्रह करायला हवा; कारण तीर्थाटन करण्यासाठी लोकांची ये-जा गोव्यात वाढल्यानंतर स्वाभाविकपणे लोकांची आर्थिक परिस्थितीही अधिक सुदृढ होणार आहे, तसेच यातून ‘गोवा ही केवळ भोगभूमी नसून देवभूमी आहे’, हेही लोकांना कळेल.

७. गोव्याची धार्मिक पार्श्वभूमी कळण्यासाठी सरकार काय करू शकते ?
सध्याची अयोग्य प्रतिमा पुसली जाऊन गोवा धार्मिक आहे, हे लोकांना कळण्यासाठी सरकार काही पावले निश्चितच उचलू शकते. यातून ‘धार्मिक पर्यटन’, ‘तीर्थाटन’ असे शब्द संकेतस्थळावर रूढ व्हायला साहाय्य होईल. यासाठी सरकार विमानतळ, रेल्वेस्थानक, बसस्थानक येथे दूरचित्रवाणी संच लावून त्यांवर गोव्यातील मंदिरे, तीर्थक्षेत्रे यांची माहिती दाखवू शकते. पर्यटक गोव्यात फिरत असतात, तर त्यांना ठिकठिकाणी दर्शनी भागात मंदिरांची माहिती दिसेल, असे फ्लेक्स आणि होर्डींग्ज लावले जाऊ शकतात. ‘टूरिस्ट गाईड’ (पर्यटनासाठीचे मार्गदर्शक) असलेल्या लोकांना गोव्यातील मंदिरांची माहिती पर्यटकांना सांगणे अनिवार्य करू शकतो. गोव्याविषयी धार्मिक माहिती सांगणारे लिखाण, आश्रम, मठ, येथे साजरे होणारे मोठे धार्मिक उत्सव, उदा. जांबावलीचा गुलालोत्सव, पेडणे येथील दसरा, वास्को सप्ताह, देव दामोदराचा दिंडी उत्सव, माशेलचा चिखलकालो इत्यादींचे व्हिडिओ यांचे निरंतर प्रसारण करू शकतो. अशा कितीतरी माध्यमांतून गोव्याचे तीर्थाटन ही संकल्पना वृद्धींगत होऊ शकते.
८. गोव्यातील नागरिकांच्या संदर्भातील चांगले अनुभव !
प्रत्येक ठिकाणी गेल्यावर स्वतःला चांगले-वाईट अनुभव येत असतात. त्यावरूनही आपण त्या प्रदेशाविषयी स्वतःचे मत बनवत असतो. काही अपवादात्मक सामाजिक घटक सोडले, तर मला गोवा येथे नागरिकांसंदर्भात आलेले काही चांगले अनुभव येथे देत आहे. त्यावरून ही देवभूमी कशी, हे समजायला आणखी सोपे होईल.
अ. एका नागरिकाचे द्रष्टेपण : मी माझ्या बहिणीसाठी घर शोधायला गोव्यातील फोंडा शहरामध्ये काही ठिकाणी फिरत होतो. एका व्यक्तीला ‘आजूबाजूला कुठे घर विक्रीला आहे का ?’, असे विचारले. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, ‘‘३० तारखेनंतर पहा.’’ खरोखरच पुढील मासाच्या १ तारखेला गावात अन्य ठिकाणी बहिणीसाठी घर मिळाले. ‘या प्रसंगात जणूकाही त्या व्यक्तीने त्या मासाच्या ३० तारखेच्या पुढे तुम्हाला घर मिळेल’, हे आम्हाला द्रष्टेपणाने सुचवले होते.
आ. एका युवकाने घाईत असूनही केलेले साहाय्य : अन्य एका भागामध्ये फिरतांना एक युवक अतिशय घाईत महाविद्यालयात जाण्यासाठी निघाला होता. त्याला एका घराचा पत्ता विचारल्यावर तितक्या घाईतही तो गाडीवरून खाली उतरला. त्याने घरात बोलावून आमची त्याच्या आईशी ओळख करून दिली. आईला ‘हे लोक घराच्या शोधात आहेत, तर साहाय्य करावे’, असे सांगून तो युवक महाविद्यालयात गेला. हा अनुभव आम्हाला पुष्कळच विस्मयकारक होता.
इ. ‘रियल इस्टेट एजंट’ने (घर खरेदी-विक्री करणार्या दलालाने) चुकीसाठी क्षमा मागणे : घराच्या संदर्भात एका रियल इस्टेट एजंटशीसुद्धा संपर्क आला. त्याने एक घर आम्हाला दाखवले. ते घर अतिशय अस्वच्छ, अयोग्य वसाहतीत आणि चांगले नव्हते. ते पाहून आल्यानंतर बाहेर आल्या आल्या आम्ही काही बोलायच्या आत त्या एजंटने स्वतः गर्भ श्रीमंत असूनही आमची हात जोडून क्षमा मागितली आणि ‘तुमच्यासारख्या साधक वृत्तीच्या लोकांना मी असे घर दाखवायला नको होते. हे माझ्या आधीच लक्षात यायला होते’, असे म्हणून क्षमा मागितली.
ई. मी बराच वेळ उन्हात उभा आहे, हे पाहून अनोळखी व्यक्तीने घरात बसण्यास सांगणे : माझ्या बहिणीसाठी घर खरेदीचा निर्णय झाल्यानंतर त्याची कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी मी एका अधिवक्त्यांच्या कार्यालयात गेलो. अधिवक्ते बाहेर गेलेले असल्याने मी रस्त्यावर उभा राहून त्यांची वाट पहात होतो. थोड्या वेळाने समोरच्या बंगल्यातून एक मनुष्य बाहेर आला आणि मला म्हणाला, ‘‘तुम्ही बराच वेळ बंगल्याच्या बाहेर उन्हात उभे आहात. बहुतेक कुणाची तरी वाट पहात आहात, तरी कृपया तुम्ही बंगल्याच्या आतमध्ये येऊन बसा. तेथे हॉलमध्ये पंखा लावून पाणी प्या. तुम्हाला तेथूनच ज्यांची वाट पहात आहात, ते आल्याचे दिसू शकेल.’’ त्या गृहस्थाचे हे बोलणे ऐकून मी अवाकच झालो; कारण अन्यत्र ‘कुणीतरी परका माणूस आपल्या बंगल्यासमोर पुष्कळ वेळ उभा आहे’, या विचाराने मनात संशयाची भावना निर्माण होऊन संबंधित बंगल्याचा मालक येऊन आपल्यावर ओरडू शकतो’; परंतु गोव्यात मात्र मला अगदी विपरित अनुभव आला आणि आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
उ. शासकीय कार्यालयातील एका महिला कर्मचार्याने ओळख नसतांना साहाय्य करणे : एका कामानिमित्त मी एका शासकीय कार्यालयात गेलो असतांना तेथील अधिकारी बैठकीमध्ये होते. ‘ती बैठक बराच काळ चालणार’, हे लक्षात आल्यानंतर तेथे कामाला असलेली एक महिला मला म्हणाल्या, ‘‘सर, तुमचा भ्रमणभाष क्रमांक मला द्या आणि तुम्ही घरी जा. बैठक संपायला आल्यानंतर मी तुम्हाला संपर्क करते.’’ मला वेळ असल्याने मी त्यांना म्हटले, ‘‘ताई, मी काम झाल्यावरच घरी जाईन.’’ तेव्हा त्यांनी मला डब्यातून आणलेला त्यांच्या घरी तयार केलेला शिरा खायला दिला. बैठक संपल्यानंतर अधिकारी निघण्याच्या घाईत असतांना त्यांना थांबवून त्या ताईंनी अधिकार्याला विचारले, ‘‘हे गृहस्थ बर्याच वेळापासून आपली वाट पाहत आहेत. त्यामुळे त्यांच्या कागदपत्रांवर तुम्ही स्वाक्षर्या करून जाऊ शकता का ?’’ तेव्हा त्या अधिकार्यांनीही अगदी आनंदाने माझ्या कागदपत्रांवर स्वाक्षर्या केल्या आणि त्यानंतरच ते जेवायला गेले. ते गेल्यावर त्या ताई मला म्हणाल्या, ‘‘जर आपण त्यांना थांबवले नसते, तर त्यांची तुमची भेट नंतर होऊ शकली नसती. तुम्हाला उगाचच दुसर्या दिवशीपर्यंत थांबावे लागले असते आणि नंतरही खेपा घालाव्या लागल्या असत्या. त्यामुळे मी त्यांना जेवायला जात असतांना थांबवले.’’ असा अनुभव मला महाराष्ट्रात असतांना आणि तोही शासकीय कार्यालयात तर कधीच आला नाही. एखादा कर्मचारी अशा पद्धतीने अपरिचित व्यक्तीला साहाय्य करू शकतो, हे मला येथे विशेष वाटले.
ऊ. बहिणीच्या शेजार्यांनी परिचय नसतांना नाचणीचे सत्त्व खायला आणून देणे : गोव्यामध्ये शेजारी आलेल्या व्यक्तीला प्रेम देणे, हा येथील लोकांचा मूलभूत गुणधर्म आहे. जेव्हा मी बहिणीच्या घरी रहायला गेलो, तेव्हा तिसर्याच दिवशी शेजारच्या व्यक्तीने दार ठोठावले आणि मला गोव्यातील प्रसिद्ध पदार्थ नाचणीचे सत्त्व खायला आणून दिले. त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘हा आमचा गोव्याचा विशेष घरगुती आणि पौष्टिक पदार्थ आहे. तुम्ही याची चव घ्या, माझ्या आईने स्वतः बनवले आहे.’’ त्यानंतर कालांतराने घरी फणस कापल्यानंतर फणस खायला बोलावणे किंवा अन्य प्रसंगी अनौपचारिक बोलावणे, हे नित्याचे झाले.
ए. पाण्याच्या टँकरच्या चालकाने केवळ पूजा आहे म्हणून कठीण ठिकाणी टँकर चढवणे : ताईच्या घरी गृहप्रवेशाची पूजा होती, नेमके त्याच दिवशी पाणी न आल्याने संकुलातील पाणी संपले. घरी पूजेच्या निमित्ताने अतिथी येणार होते. त्यामुळे शासकीय कार्यालयात अर्ज देऊन पाण्याचा टँकर मागवला. तेथील अधिकार्यांनी पाण्याच्या टँकरचालकाचा क्रमांक दिला आणि त्याला संपर्क करायला सांगितले. ताईचे घर उंचावर असल्याने तेथे टँकर चढवणे कठीण होते आणि वाहन मोठे असल्याने वळवायला अडचणीचे होते. तरीही घरी पूजा आहे, या लोकांची गैरसोय होऊ नये, या विचाराने टँकरचालकाने अत्यंत अडचणीच्या जागेतून टँकर संकुलात आणला आणि पाणीपुरवठा केला. ‘या ठिकाणी टँकरचालकाची पैशासाठीची अपेक्षा नव्हती, तर धार्मिक कार्यक्रम आहे, या विचाराने त्याने हे धाडस केले होते’, हे त्याच्याशी नंतर बोलतांना कळले.
ऐ. शासकीय रुग्णालयात एकदाच ओळख झाल्यावर तेथील सुरक्षारक्षकाने प्रत्येक वेळी साहाय्य करणे : एकदा एका आरोग्य पडताळणीसाठी मी बांबोळी येथील रुग्णालयात गेलो असतांना तेथील सुरक्षारक्षकाची अनौपचारिक चौकशी केली आणि तपासणी करून मी परत आलो. त्यानंतर बर्याच काळाने मी परत जेव्हा त्या रुग्णालयात गेलो, तेव्हा तो सुरक्षारक्षक स्वतःहून माझ्याकडे आला. त्याने माझी चौकशी करून माझी पडताळणी लवकर कशी होईल, या दृष्टीने त्याने त्याला शक्य होईल ते सर्व साहाय्य मला केले. हे त्याने एक-दोनदा नव्हे, तर प्रत्येकच वेळी केले. ‘केवळ एका भेटीमध्ये एखादी व्यक्ती आपल्याशी इतकी प्रेमाने कशी वागू शकते’, याची कल्पनाही मी करू शकलो नाही. हेही गोमंतकियांचे एक वैशिष्ट्य मला शिकायला मिळाले.
ओ. साधिकेची चूक असूनही एका व्यक्तीने तिच्याशी न भांडता तिला साहाय्य करणे : एक साधिका नवीनच दुचाकी वाहन शिकली. एकदा तिने दुचाकी वाहन चुकीच्या दिशेने अन्य गाडीच्या पुढे नेले. त्यामुळे तिच्या समोर असलेल्या वाहनचालकाला अडचण आली. समोर गेल्यावर साधिकेला स्वतःची चूक लक्षात आली आणि मागील व्यक्ती रागावली असेल, या विचाराने तिने मागे वळून पाहिले; परंतु ती शिकाऊ असल्याने मागे वळून पहात असतांनाच तिचा तोल गेला आणि तिची गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. हे पहाताच मागून येणारी व्यक्ती त्वरेने धावत आली आणि त्या व्यक्तीने साधिकेची अत्यंत प्रेमाने चौकशी करून तिला आधार दिला. तिची गाडी उचलून साधिकेला आणि गाडीला काही लागले नाही ना, हे पडताळले अन् साधिकेला तिचे काय चुकले, याची प्रेमाने जाणीव करून देऊन पुढील वेळेस वाहन चालवतांना काय काळजी घ्यायची, हेही प्रेमाने शिकवले.
यातून तुलनात्मक अभ्यास केला, तर गोमंतकीय व्यक्तीचे वैशिष्टय शिकायला मिळते. एरव्ही अशा प्रसंगात कशी भांडणे होतात, हे आपण नेहमीच रस्त्यावर अनुभवत असतो.
ही उदाहरणे केवळ वानगीदाखल आहेत. असे अनेक चांगले अनुभव मला गोव्यात आले आहेत. यावरून गोव्यासारख्या सात्त्विक ठिकाणाची निवड सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेचे मुख्यालय चालू करण्यासाठी का केली ? हे माझ्या लक्षात आले. अशा आध्यात्मिक वातावरणामुळेच येथे अन्य राज्यांच्या तुलनेत हिंदु राष्ट्र नक्कीच लवकर येईल, असे वाटले.’
(समाप्त)
– श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम. (१६.६.२०२५)
| ‘गोवा देवभूमी आहे’, हे देश-विदेशात कळण्यासाठी सरकारने ‘तीर्थाटना’साठी विविध स्तरांवर प्रयत्न करणे आवश्यक ! |

संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव