सार्वजनिक वाहनांमधील ‘पॅनिक बटण’ बंद !

महिला आयोगाकडून परिवहन विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश !

प्रतीकात्मक छायाचित्र

नागपूर – महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता, प्रवाशांची सुरक्षितता जपण्याच्या दृष्टीकोनातून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व टॅक्सी, रिक्शा, बस आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्‍या वाहनांमध्ये ‘पॅनिक बटण’ अनिवार्य केले होते; मात्र ते काम करत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्याची नोंद घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र लिहून २ दिवसांत कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. निर्भया घटनेनंतर १ ऑगस्ट २०२२ पर्यंत ‘पॅनिक बटण’ लावणे अनिवार्य केले होते.


असे काम करते पॅनिक बटण !

एखादा प्रवासी किंवा चालक धोक्यात असतो, तेव्हा तो ‘पॅनिक बटण’ दाबतो. हे बटण लाल रंगाचे असते आणि ते वाहनात सहज दिसेल अशा ठिकाणी बसवलेले असते. ते वाहनाच्या जी.पी.एस्. ट्रॅकिंग सिस्टीमशी जोडलेले असते. बटण दाबल्यावर आपत्कालीन नियंत्रण कक्षाला किंवा वाहतूक विभागाला आपोआप एक संदेश पाठवला जातो, त्यामध्ये वाहनाचे लोकेशन (स्थान) आणि इतर महत्त्वाची माहिती असते. आपत्कालीन नियंत्रण कक्ष किंवा संबंधित विभाग या माहितीची पडताळणी करतो. त्यांना संदेशाद्वारे कळते की, वाहनामध्ये काहीतरी समस्या आहे. माहिती मिळाल्यानंतर अधिकारी साहाय्यासाठी पाठवले जातात. ते वाहन थांबवून चौकशी करतात.