बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जो विकास केला, तसा पूर्वी कधीच झाला नाही ! – मुख्यमंत्री सावंत

पणजी, २० सप्टेंबर (वार्ता.) – बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जो  विकास केला, तसा यापूर्वी कधीच झाला नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बिहारमधील पाटलीपुत्र आणि बांकीपूर येथे आयोजित भाजप कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, बिहारचे मंत्री नितीन नबीन, खासदार संजय जैस्वाल आणि इतर नेते उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘बिहारचा असा विकास काँग्रेस किंवा लालूप्रसाद यादव यांच्या काळात कधीच झाला नाही. कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा उत्साह पहाता बिहारमध्ये पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार येणार आहे. युवक आणि महिला यांना मोदींविना विकास होऊ शकणार नाही, हे समजले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार विजयी होईल.’’

मतचोरीच्या आरोपाविषयी ते म्हणाले, ‘‘राहुल गांधी निवडणुकीत पराभूत होतात, त्या वेळी त्यांना मतचोरी दिसते. त्यांना कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत मतचोरी दिसत नाही. घुसखोरांच्या मतांवर ते मतचोरीचा विषय मांडत आहेत. इथे असा काही विषय नाही. बिहारमध्ये ज्या पद्धतीचा विकास झाला आहे, त्याच आधारावर लोक मतदान करतील. सध्याचे सरकार युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आणि गरिबांचे कल्याण या तत्त्वावर काम करत आहे.’’