
सांगली, ४ सप्टेंबर (वार्ता.) – सांगली आणि मिरज येथे यंदाच्या गणेशोत्सवात विविध पौराणिक अन् भक्तीमय वातावरणात विविध गणेशोत्सव मंडळांचे देखावे पहाण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. सांगली नगरीचे आराध्यदैवत श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरातील रोषणाई, तसेच कापडपेठ, वखार भाग, गणपति पेठ येथील विविध गणेशोत्सव मंडळांनी सादर केलेल्या पौराणिक देखाव्यांमुळे गणेशभक्तांमध्ये उत्साह वाढला, तर दुसरीकडे काही मंडळांनी सादर केलेला भुताटकीचा देखावा आणि विविध वेशभूषेतील विडंबनात्मक गणेशमूर्तींमुळे भाविकांमध्ये नाराजी आहे.
सांगली
येथील श्री कापड पेठ गणेशोत्सव मंडळाने सादर केलेला ‘जगन्नाथ पुरीचे रहस्य’ हा देखावा, सराफ बाजार येथील तारकासुराचा वध, मोटर स्टँन्ड गणेशोत्सव मंडळाचा शिवपार्वती विवाहाचा जिवंत देखावा, श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथील गणेशोत्सव मंडळाचा समुद्रमंथन देखावा, पटेल चौक यांचा शिवराज्याभिषेक, वखार बागेत गणेशोत्सव मंडळाने सादर केलेला ‘ऑपरेशन सिंदूर’ हा हलता देखावा यांना गणेशभक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मिरज (जिल्हा सांगली)
मिरज शहरात प्रतिवर्षी विविध मंदिरांच्या प्रतिकृती सादर करणारे येथील जैन बस्तीजवळील विघ्नराज गणेशोत्सव मंडळ यांनी या वर्षी कोल्हापूर येथील ज्योतिबा मंदिराची सुंदर प्रतिकृती सादर केली आहे. थर्माकोलपासून बनवलेली प्रतिकृती पहाण्यासाठी सर्वांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सांगलीचे कलाकार श्री. मुकुंद पटवर्धन यांनी ही प्रतिकृती बनवली आहे. शास्त्रशुद्ध मूर्ती आणि प्रतिदिन पालटले जाणारी वस्त्रे, तसेच मंडळासमोर श्री गणेश यागाचे आयोजन केल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह जाणवत होता. मंडळाचे अध्यक्ष श्री. मयूर कवठेकर, पदाधिकारी सर्वश्री सुनील परीट, नितीश सहस्रबुद्धे, श्रेयस गाडगीळ आणि ओंकार हराळे यांचा मंडळाच्या कार्यात उत्स्फूर्त सहभाग आहे. ज्योतिबा मंदिराचे संपूर्ण दर्शन व्हावे, रचना लोकांपर्यंत पोचावी या उद्देशाने हा देखावा सादर केल्याचे अध्यक्ष श्री. मयूर कवठेकर यांनी सांगितले.
![]() |
![]() |
| मिरज येथील बुधवार पेठ गणेशोत्सव मंडळाच्या वतीने अमरनाथ दर्शन आणि झुलता पूल देखावा सादर | धर्मप्रेमी श्री. महेश मारुति चौंदीकर यांनी त्यांच्या घरी केलेला ‘ऑपरेशन सिंदुर’चा सुंदर देखावा |
![]() |
![]() |
| ‘विश्व चौक गणेशोत्सव मंडळा’ने सादर केलेला ‘जोतिबाची सासनकाठी’ देखावा | ‘गोंधळी समाज गणेशोत्सव मंडळा’ने विविध देवतांच्या मूर्तींचा केलेला देखावा |
नदीवेस परिसरातील महात्मा गणेशोत्सव मंडळाने ‘पावनखिंड’ देखावा सादर केला आहे. ‘इतिहासाच्या स्मृतीने लोकांमध्ये धर्माभिमान जागृत व्हावा, या उद्देशाने हा देखावा सादर केला आहे’, असे मंडळ कार्यकर्ते केदार गौड, अभी मंगसुळे यांनी सांगितले. बुधवार पेठ गणेशोत्सव मंडळाच्या वतीने अमरनाथ दर्शन आणि झुलता पूल देखावा सादर केला. कैलास पर्वत आणि गुहेतील अमरनाथ शिवलिंग यांची प्रतिकृती मंडळाने सादर केली आहे. सर्वश्री अनिकेत फुटाणे, गिरीश हारगे, संकेत कबाडे, गजराज फुटाणे यांनी हा देखावा शिवभक्ती जागृतीसाठी आणि संस्कृतीचा प्रसार व्हावा, या उद्देशाने सादर केला आहे.

मिरज शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांमध्ये काही गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक आणि पौराणिक देखावे सादर करून भाविकांचे मन जिंकले आहे. हे देखावे पहाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
मिरज येथे ब्राह्मणपुरी भानू तालीमजवळ ‘विश्व चौक गणेशोत्सव मंडळा’ने ‘जोतिबाची सासनकाठी’ हा सुंदर देखावा केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा तीर्थक्षेत्री प्रतिवर्षी यात्रा भरते. त्यात जोतिबाची सासनकाठी घेऊन मिरवणूक काढली जाते, त्याचा हा देखावा आहे. याचप्रमाणे मालगाव रस्त्यावरील गजरत्न गणेशोत्सव मंडळाने ‘दख्खनचा राजा’, असे नाव देऊन श्री केदारलिंग जोतिबाचा तांत्रिक देखावा सादर केला आहे. या मंडळाच्या शेजारी वास्तव्यास असलेले धर्मप्रेमी श्री. महेश मारुति चौंदीकर यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा सुंदर देखावा त्यांच्या घरी केला आहे, तसेच माधव चित्रपटागृहाजवळ असलेल्या गोंधळी समाज गणेशोत्सव मंडळाने श्रीराम, वामन, बलराम, परशुराम, मत्स्य आदी अशा विविध देवतांच्या मूर्तींचा केलेला देखावा पहाण्यासाठी भाविकांची गर्दी होती.




मोकाट कुत्र्यांना आवरा !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !