अंमलबजावणी संचालनालयाकडून गोव्यासह चेन्नई आणि कोलकाता येथे धाडी

अधिकोषांशी संबंधित ६३७ कोटी रुपयांचा घोटाळा

पणजी, २ सप्टेंबर (वार्ता.) – अधिकोषांशी संबंधित ६३७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ‘अरविंद रेमेडिज लि.’ आणि त्यांचे प्रवर्तक अरविंद बी. शाह यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाडी घातल्या आहेत. संचालनालयाकडून गोव्यासह चेन्नई आणि कोलकाता येथे धाडी घालण्यात आल्या आहेत.

‘पंजाब नॅशनल बँके’ने केलेल्या तक्रारीवरून हे प्रकरण उघडकीस आले होते. ‘पंजाब नॅशनल बँके’ने याविषयी गुन्हे अन्वेषण विभागाकडे (‘सीबीआय’कडे) तक्रार नोंदवली होती. ‘अरविंद रेमेडिज लि.’ आणि त्यांचे प्रवर्तक यांनी ६३७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. हा घोटाळा केवळ ‘पंजाब नॅशनल बँके’शी मर्यादित नसून यामध्ये ‘युनायटेड बँक ऑफ इंडिया’, ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’, ‘आय.डी.बी.आय. बँक’, ‘अलाहाबाद बँक’, ‘करूर वैश्य बँक’, ‘इंडियन ओव्हरसीज बँक’ आणि ‘कॉर्पाेरेशन बँक’ यांसारख्या इतर अधिकोषांचीही फसवणूक झालेली आहे. या सर्व अधिकोषांनी संबंधित आरोपी आस्थापनाला एकूण ७०४ कोटी रुपयांहून अधिक कर्ज दिल्याचे अन्वेषणात समोर आले आहे. अन्वेषणात समोर आलेल्या माहितीनुसार आस्थापनाने कर्जाची रक्कम व्यवासायात गुंतवण्याऐवजी बनावट आस्थापने (शेळ कंपन्या) आणि बेनामी खाती यांद्वारे काढून घेतली. अंमलबजावणी संचालनालयाने आस्थापन आणि तिचे प्रवर्तक यांच्याशी संबंधित २९४ अधिकोष खात्यांचे अन्वेषण केल्यानंतर ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. या फसवणुकीमुळे वर्ष २०१४-२०१५ मध्ये या सर्व अधिकोषांनी आस्थापनांच्या खात्यांना ‘नॉन परफॉर्मिंग असेट्स’ (एन्.पी.ए.) घोषित केले.