ज्यांनी बाँबस्फोट केले त्यांना पकडणे अपेक्षित असतांना तत्कालीन सरकारने याला हिंदु-मुसलमान असा रंग दिला ! – समीर कुळकर्णी

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील निर्दोष मुक्तता झालेले श्री. समीर कुळकर्णी यांची मुलाखत !

श्री. समीर कुळकर्णी

चिंचवड (जिल्हा पुणे) – मालेगाव येथे वर्ष २००८ मध्ये बॉंबस्फोट झाला. यापूर्वीही वर्ष २००६ मध्ये बॉंबस्फोट झाला होता. तत्कालीन सरकारचे हे अपयश होते. वर्ष २००८ मधील मालेगाव बाँबस्फोटानंतर दुसर्‍या दिवशी तत्कालीन गृहमंत्री घटनास्थळी गेले, त्या वेळी तेथेही ५६ गोळ्या झाडण्याची घटना घडली होती. पोलिसांवरसुद्धा अत्याचार करण्यात आले होते. एका पोलीस अधिकार्‍याचे कान कापले होते. ही घटना घडली, तेथेच सिमीचे कार्यालय होते. त्याविषयीचे खटले आजही प्रलंबित आहेत. ज्यांनी बाँबस्फोट केले, त्यांना पकडणे अपेक्षित असतांना तत्कालीन सरकारने याला हिंदु-मुसलमान असा रंग दिला, असे प्रतिपादन हिंदुत्वनिष्ठ श्री. समीर कुळकर्णी यांनी व्यक्त केले.

चिंचवड येथील ‘रामकृष्ण मोरे नाट्यगृहा’त मालेगाव बाँबस्फोट खटल्यातून नुकतेच निर्दोष मुक्तता झालेले हिंदुत्वनिष्ठ श्री. समीर कुळकर्णी यांच्या जाहीर मुलाखतीच्या कार्यक्रमाचे १२ ऑगस्टला ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवडमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलाखतीला त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्रमिक गोजमगुंडे यांनी श्री. समीर कुळकर्णी यांची मुलाखत घेतली.

श्री. समीर कुळकर्णी यांचे कार्यक्रमस्थळी आल्यावर ढोल-ताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘श्री क्षेत्र देहु देवस्थाना’चे प्रमुख श्री. माणिक मोरे महाराज आणि ‘श्री मोरया गोसावी चिंचवड देवस्थाना’चे प्रमुख श्री. जितेंद्र देव महाराज अन् श्री. समीर कुळकर्णी यांनी व्यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन केले. त्यानंतर श्री. समीर कुळकर्णी यांचे स्वागत आणि सन्मान श्री. माणिक मोरे महाराज अन् श्री. जितेंद्र देव महाराज यांनी केला. उपस्थित अन्य मान्यवरांचा सन्मानही या वेळी करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता पूर्ण वन्दे मातरम् म्हणून झाली.

श्री. समीर कुळकर्णी यांनी मांडलेला घटनाक्रम !

१. वर्ष २००९ मधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे षड्यंत्र रचण्यात आले होते. शरद पवार यांना पंतप्रधानपदाचे स्वप्न पडले. त्यातून त्यांनी हिंदु-मुसलमान यांचे लांगूलचालन करत राजकारण केले. कथित भगवा आतंकवाद समोर आणला. खोट्या नावाने मला भोपाळमधून अटक केली. अनेक दुचाकी वाहनांच्या चासी (गाडीचा भाग) आणि इंजिन क्रमांक खोडले. वाहन परवाना नाही, वाहन चालवता येत नाही, अशा साध्वी प्रज्ञासिंह यांना अटक केली. त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. यामुळे आज त्या चालूसुद्धा शकत नाहीत.

२. तत्कालीन काँग्रेस सरकारमुळे खोटी नावे घेण्यास सांगितले जात होते. आम्ही सर्व जण शाकाहारी असूनही आमच्या तोंडात मांसाचे तुकडे घातले जायचे. केवळ आम्ही साक्षीदार व्हावे; म्हणून आणि आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील अन् अन्य हिंदु संघटनांची नावे घ्यावीत; म्हणून आम्हाला अमानुष मारहाण करून दबाव आणला जायचा; पण आम्ही कधीही याला फसलो नाही.

हिंदु संस्कृतीतील पुरुषार्थाचा विजय !

आर्थिक अडचणींमुळे मी या खटल्यासाठी माझा अधिवक्ता नेमू शकलो नाही. कारावासात कागद आणि पेन उपलब्ध नसतांना कायद्याचा अभ्यास करून स्वत:ची बाजू स्वत: न्यायालयासमोर मांडली. या १७ वर्षांच्या अंध:कारमय काळातून बाहेर पडतांना सर्वशक्तीमान अशा परमेश्वराच्या अस्तित्वाची अनुभूती आली आणि अशा विपरीत परिस्थितीत केवळ आपल्या धर्माच्या, मातृभूमीच्या आणि कुटुंबाच्या संस्कारांमुळे मला हे सर्व करणे शक्य झाले, याची जाणीव झाली. या खटल्यातील आरोपींना इतका त्रास देऊनसुद्धा सगळे निर्दोष सिद्ध झाले. हा कोणत्या व्यक्तींचा, वैयक्तिक किंवा संघटनांचा सांघिक विजय नसून हा हिंदु संस्कृतीतील पुरुषार्थाचा विजय आहे आणि यापुढे निर्दोष हिंदुत्वनिष्ठांना असा त्रास देण्याची कुणाचे धाडस होणार नाही.

यापुढील आयुष्य हे हिंदु धर्माची सेवेत व्यतीत करण्याचा मनोदय !

माझा रक्तगट दुर्मिळ प्रकारात गणला जात असल्याने कारागृहात असतांना त्याही मन:स्थितीत २७ वेळा रक्तदान करून ‘आम्ही रक्त देणारे असून रक्त काढणारे नाहीत’, हे कृतीतून दाखवून दिले. यापुढील आयुष्य हे हिंदु धर्माची सेवा आणि काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपवणे, ही ध्येये घेऊन व्यतीत करण्याचा मनोदय श्री. कुळकर्णी यांनी व्यक्त केला. तसेच हिंदूंनी यापुढे प्रत्येक निवडणुकीत मतदान करतांना राष्ट्रद्वेषी, धर्मद्वेषी अशा काँग्रेसच्या मंडळींना मतदान करू नये, असे आवाहन केले. हे सर्व अनुभव सांगताना श्री. समीर कुळकर्णी भावनाविवश झाले होते.

मला भरभरून साहाय्य करणार्‍या सर्वांचा मी ऋणी आहे !

मी एक सामान्य व्यक्ती आहे. आजही मी चिंचवड येथील माझ्या भागातील अनेकांना ओळखत नाही; परंतु माझी निर्दोष सुटका झाल्यावर मला सर्वांनीच आधार दिला. माझी आई पुष्कळ वयस्क आहे. तिनेसुद्धा पुष्कळ हालाखीत दिवस व्यतीत केले; पण आज सर्वच हिंदु बांधवांनी माझ्यावर प्रेम करत माझा सन्मान केला, मला भरभरून साहाय्य केले आणि सर्वांसमोर आणून सन्मान केला, यासाठी मी सर्वांचा ऋणी आहे, असे कुळकर्णी यांनी शेवटी सांगितले.