राष्ट्र्रभक्तीच्या पाचव्या वेदाचे महर्षि : स्वातंत्र्यवीर सावरकर ! – प्रा. श्याम देशपांडे, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे अभ्यासक

लोकमान्य टिळकांचे अनुयायी ‘स्व. मामा दाते स्मृती’ पुरस्कार वर्धा येथील प्रा. श्याम देशपांडे यांना प्रदान !

पुरस्कार प्रदान करतांना डावीकडून सर्वश्री अनिल पवार, अभयसिंह कुलकर्णी, डॉ. मुन्ना शर्मा, प्रा. श्याम देशपांडे, सुनील कुमार आणि कीर्तनकार चारुदत्त आफळे

वर्धा, ७ ऑगस्ट (वार्ता.) – ‘सागरातून उसळलेले वादळ, भूमीतून निघणारा ज्वालामुखी आणि वनात पेटलेला वडवानल एक वेळ कुणालाही शमवता येईल; परंतु राष्ट्रप्रेम आणि राष्ट्र्रभक्ती यांसाठी  सर्वस्वाचे समर्पण करणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी राष्ट्रसंरक्षण, संगोपन आणि संवर्धन संबंधी लिहिलेले साहित्य आणि त्यासम त्यांचे चरित्र वाचून तरुण पिढीवर पडलेला प्रभाव कोणत्याही विरोधकाला थांबवणे शक्य नाही, कारण सावरकर म्हणजे राष्ट्रासाठी निर्माण झालेले राष्ट्रभक्तीच्या ५ व्या वेदाचे महर्षी होय, असे विचार वर्धा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे अभ्यासक आणि ‘सावरकर स्मारक स्मृती उद्याना’चे संकल्पक प्रा. श्याम देशपांडे यांनी सत्काराला उत्तर देतांना व्यक्त केले.

‘अखिल भारतीय हिंदु महासभा’ आणि ‘महाराष्ट्र प्रदेश हिंदु महासभा’ यांच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त पुणे येथील उद्यान मंगल कार्यालयात समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात लोकमान्य टिळकांचे अनुयायी, थोर विचारवंत, प्रकाशक आणि लेखक स्व. शंकर रामचंद्र उपाख्य मामा दाते यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार यावर्षी प्रा. श्याम देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुन्ना कुमार शर्मा, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, हिंदु महासभेचे राष्ट्रीय महामंत्री सुनील कुमार, वीरेश त्यागी, महाराष्ट्र प्रांत हिंदु महासभेचे अध्यक्ष अनिल पवार, प्रांत सचिव अभयसिह कुलकर्णी, कार्याध्यक्ष तिरुपती रेड्डी आदी उपस्थित होते.

कीर्तनकार चारुदत्त आफळे म्हणाले, ‘‘सध्या हिंदूंसाठी अंधार दिसत असला, तरी भविष्य उज्वल आहे .हिंदुस्थान विश्वगुरु होत आहे आणि पुढील काळात सार्‍या विश्वातील राष्ट्रांसाठी भारतीय संस्कार, तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि संत-महात्म्यांची शिकवण दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरील, यात शंका नाही.’’

क्षणचित्र

या समारंभात पंढरपूरचे माजी नगरसेवक, पत्रकार विवेक बेणारे यांनाही पुण्याचे पहिले महापौर ‘गणपतराव नलावडे स्मृती’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.