वाळपई पालिका क्षेत्रात कचर्‍याचे संकलन करण्याच्या ठिकाणी राष्ट्रध्वज

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाळपई येथील उपजिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

उपजिल्हाधिकारी श्री. लक्ष्मीकांत कुर्टीकर यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे शिष्टमंडळ

वाळपई, ५ ऑगस्ट – वाळपई नगरपालिकेच्या अखत्यारीतील कचर्‍याचे संकलन करण्याच्या ठिकाणी अनेक राष्ट्रध्वज कचर्‍यात टाकलेले आढळले आहेत. ही गोष्ट अत्यंत गंभीर असून भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान करणारी आहे. या प्रकरणाचे अन्वेषण करून दोषींवर गुन्हा नोंद करावा, अशी तक्रार हिंदु जनजागृती समितीने वाळपई तालुक्याचे उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत कुर्टीकर यांच्याकडे केली आहे. ही तक्रार करतांना हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री वेदांत जोशी, प्रदीप देसाई, अनिल देसाई, श्रीकांत बर्वे, सौ. आनंदी गावकर आणि सौ. दीपिका नाईक यांचा सहभाग होता. या तक्रारीची प्रत वाळपई पोलीस ठाण्याचे निरीक्षक विदेश शिरोडकर यांनाही देण्यात आली आहे.

समितीने तक्रारीत म्हटले आहे की, राष्ट्रध्वजाचा अवमान करणे हे ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा १९५०’ कलम २ आणि ५ नुसार आणि ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान अधिनियम १९७१’चे कलम २ या २ कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहे. या प्रकरणी वाळपई पालिकेल्या संबंधित कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व नगरपालिकांना सक्त निर्देश द्यावेत.

शिष्टमंडळाशी बोलतांना उपजिल्हाधिकारी श्री. कुर्टीकर म्हणाले, ‘‘मी या संदर्भात चौकशी चालू केली असून वाळपईचे मामलेदार, तसेच नगरसेवक यांच्याशीही चर्चा केलेली आहे अन् तपास चालू आहे. तुम्ही या दंडनीय कृत्याची त्वरित नोंद घेऊन मला निवेदन दिले, ही कृती अभिनंदनीय आहे.’’