कोथरूड (पुणे) पोलिसांवर सामाजिक कार्यातील मुलींच्या छळाचा आरोप !

  • छत्रपती संभाजीनगर येथील एका पीडितेला साहाय्य केल्याचे प्रकरण

  • राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचे कारवाईचे आश्वासन !

 

पुणे – येथील कोथरूड पोलीस ठाण्यात ३ मागासवर्गीय मुलींचा पोलिसांकडून छळ झाल्याचा आरोप केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकरणाच्या अन्वेषणासाठी या मुलींना कोथरूड पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. तेथील ‘रिमांड रूम’मध्ये या मुलींचा ५ घंटे छळ करण्यात आला. या वेळी पोलिसांकडून जातीवाचक शिवीगाळ आणि मुलींचा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप आहे. पीडित मुलींसह शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याशी चर्चा केली. या वेळी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, सुजात आंबेडकर यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते; मात्र अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याशी चर्चा करूनही गुन्हा नोंद न झाल्याने खेद व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नोंद घेत त्या मुलींशी भ्रमणभाषवरून चर्चा करून कारवाईचे आश्वासन दिले आहे.

पोलिसांकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी या प्रकरणात तथ्य असेल तर कारवाई करू, असे सांगितले आहे.

काय आहे प्रकरण ? 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २३ वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणार्‍या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती.  तिला ‘वन स्टॉप सखी सेंटर’मध्ये प्रविष्ट करून स्वावलंबी होण्यासाठी ‘कौशल्य विकास’ असा अभ्यासक्रम शिकवण्यात आला. ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्या महिलेला साहाय्य केलेल्या सामाजिक कार्यातील ३ मुलींना कोथरूड पोलिसांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता कह्यात घेतले गेले. त्या महिलांवर पोलीस ठाण्यामध्ये जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप मुलींनी केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे अमोल कामटे आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर थेट मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत.