लवकरच आणखी ४ खाण क्षेत्रांच्या लिलावासह ऑक्टोबरपासून व्यवसाय सुरळीत होणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

प्रातिनिधिक छायाचित्र

पणजी, २९ जुलै (वार्ता.) – खाण व्यवसायाविषयी गोवा सरकार गंभीर आहे. आतापर्यंत १२ खाण क्षेत्रांचा लिलाव केला असून यामधील ३ क्षेत्रांत व्यवसाय चालू आहे. १२ मधील अन्य ४ क्षेत्रे पुढील २ महिन्यांत चालू होणार आहेत आणि उर्वरित क्षेत्रे ही विविध आवश्यक अनुज्ञप्ती मिळाल्यानंतर चालू होणार आहेत. त्याचप्रमाणे पुढील १५ दिवसांत आणखी ४ खाण क्षेत्रांचा ई-लिलाव करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २९ जुलै या दिवशी गोवा विधानसभेत प्रश्नोत्तर तासाच्या वेळी दिली. केपेचे काँग्रेसचे आमदार एल्टन डिकोस्ता यांनी विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते.

डॉ. प्रमोद सावंत

प्रश्न विचारतांना आमदार एल्टन डिकोस्ता म्हणाले, ‘‘राज्यात शाश्वत खाण व्यवसाय कधी चालू होणार ? हा व्यवसाय वर्ष २०१२ पासून बंद आहे. बंद होण्यापूर्वी गोव्यात ८८ खाण क्षेत्रे कार्यरत होती आणि सध्या चालू असलेल्या खाण क्षेत्रांची संख्या पुष्कळ अल्प आहे. यामुळे यावर अवलंबून असलेल्यांना फटका बसत आहे.’’ यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘राज्यात ऑक्टोबरपासून खाण व्यवसाय सुरळीत होणार आहे. खाण क्षेत्र चालू करतांना दक्षिण गोव्यावर अन्याय केलेला नाही. तेथील बहुतेक खाणी या वनक्षेत्रात येत आहेत. अनधिकृत खाण व्यवसायाच्या संदर्भात सरकारने वसुली केली आहे. सरकार स्वत:च्या मालकीच्या खनिज ‘डंप’चाही (‘डंप’ म्हणजे पूर्वी उत्खनन करून ठेवलेला माल) ऑनलाईन पद्धतीने लिलाव करणार आहे.’’