राज्य सरकारची हिंदी भाषा सक्तीला स्थगिती !

मुंबई – राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने त्रिभाषा सूत्र रहित करत इयत्ता ३ री ते १० वी पर्यंतचा सुधारित अभ्यासक्रम घोषित केला आहे. यातून राज्यशासनाने प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीला स्थगिती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती करण्याचा महायुती शासनाने अध्यादेश काढला होता. त्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांसह राज्यभरात मोठा विरोध झाला. त्यानंतर सरकारने दुसरा अध्यादेश काढून त्यात हिंदीव्यतिरिक्त इतर काही भाषांचा समावेश केला; पण त्यालाही मोठा विरोध झाला. शेवटी शासनाने नमते घेत त्रिभाषा सूत्र रहित केले. या पार्श्वभूमीवर आता नवीन अभ्यासक्रम घोषित करण्यात आला आहे. त्रिभाषा सूत्राविषयी पुढील निर्णय समितीच्या अहवालानंतर घेतला जाण्याची शक्यता आहे. शासनाच्या इयत्ता ३ री ते १० वी पर्यंतच्या नव्या अभ्यासक्रमात मराठी आणि इंग्रजी या २ भाषांचा समावेश करण्यात आला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने हा अभ्यासक्रम सिद्ध केला आहे. त्यात मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, कलाशिक्षण, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि पायाभूत मूल्यशिक्षण यांचा समावेश करण्यात आला आहे. या मसुद्यातून हिंदी भाषा वगळण्यात आली आहे.
त्रिभाषा सूत्रावर नरेंद्र जाधव समिती !
राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रावर विचारविनिमय करण्यासाठी अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वातील समिती नियुक्त केली आहे. ती पुढील ३ महिन्यांत सरकारला अहवाल सोपवेल; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘त्रिभाषा सूत्र लागू करणारच’, अशी भूमिका घेतली आहे, तसेच ‘हे सूत्र इयत्ता पहिलीपासून लागू करायचे कि इयत्ता पाचवीपासून, याचा निर्णय समितीचा अहवाल आल्यानंतरच घेतला जाईल’, असेही सांगितले आहे.
दुकाने नाही, तर शाळाच बंद करीन ! – राज ठाकरे
त्यावर राज ठाकरे म्हणाले की, तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याच्या निर्णयाचा आम्ही विरोध करणार आहोत. राज्य सरकारला आत्महत्या करायचीच असेल, तर त्यांनी ती करावी. ५ जुलैच्या मोर्चाच्या धसक्याने सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला. महाराष्ट्रात इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंत हिंदी भाषा आणण्याचा प्रयत्न करून बघाच. आता दुकाने नाही, तर शाळाच बंद करीन. इतर शाळांमध्ये मराठीची सक्ती केली पाहिजे.
नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षण विभागाने मागवल्या सूचना !
मुंबई, २८ जुलै (वार्ता.) – शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून महाराष्ट्रात राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचा इयत्ता ३ री ते १० वी साठीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यास लागू होणार आहे. या नवीन अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने संकेतस्थळावरून प्रसारित केली असून अभ्यासक्रम दर्जेदार होण्यासाठी नागरिकांकडून अभिप्राय मागवण्यात आले आहेत. २७ ऑगस्टपर्यंत अभिप्राय मागवण्यात आले असून त्यासाठी संकेतस्थळावर ‘क्यू.आर्.’ कोड देण्यात आला आहे.
मराठी, इतिहास, अर्थशास्त्र, संरक्षणशास्त्र, कलाशिक्षण, कार्यशिक्षण, राज्यशास्त्र, समाजसेवा आदी विविध २० विषयांच्या अभ्यासक्रमाच्या मसुद्याची वैशिष्ट्ये संकेतस्थळावर देण्यात आली आहेत.
मसुदा पहाण्यासाठी लिंक https://www.maa.ac.in/
अभिप्राय नोंदवण्यासाठी लिंक https://forms.gle/2rgGA37iYKfJUYKS6
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक