‘स्वर्गीय मामा दाते’ पुरस्कारासाठी वर्धा येथील प्रा. श्याम देशपांडे यांची निवड !’

प्रा. श्याम देशपांडे

वर्धा, २३ जुलै (वार्ता.) – स्वातंत्र्य संग्रामातील लोकमान्य टिळकांचे अनुयायी, सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते, सुप्रसिद्ध लेखक, वक्ते, प्रकाशक आणि अनेक देशभक्त क्रांतीकारकांना साहाय्य करणारे स्वर्गीय मामा दाते यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अनेक वर्र्षांपासून दिल्या जाणार्‍या ‘स्वर्गीय मामा दाते’ पुरस्कारासाठी या वर्षी वर्धा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे अभ्यासक, लेखक, वक्ते तथा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक स्मृती उद्याना’चे जिल्हाध्यक्ष प्रा. श्याम देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे.

‘अखिल भारतीय हिंदु महासभा’ आणि ‘महाराष्ट्र प्रदेश हिंदु महासभा’ यांच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट या दिवशी सदाशिव पेठ, पुणे येथील उद्यान मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या कार्यक्रमाला हिंदु महासभेचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. मुन्ना कुमार शर्मा, प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प चारुदत्त आफळे, राष्ट्रीय कीर्तनकार सौ. क्रांतीगीता महाबळ आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.