Dr. Annapurna Bharti : हिंदु महासभेच्या राष्ट्रीय सचिव महामंडलेश्‍वर डॉ. अन्नपूर्णा भारती यांना पाकमधून ठार मारण्याची धमकी

महामंडलेश्‍वर डॉ. अन्नपूर्णा भारती

अलीगड (उत्तरप्रदेश) – हिंदु महासभेच्या राष्ट्रीय सचिव महामंडलेश्‍वर डॉ. अन्नपूर्णा भारती (पूर्वीच्या पूजा शकुन पांडे) यांना व्हॉट्सअ‍ॅपवर एका अज्ञात क्रमांकावरून धमकी देण्यात आली. धमकी देणार्‍या व्यक्तीने म्हटले की ‘तुझी उलट मोजणी चालू  झाली आहे, २ दिवसांत तुला मारून टाकीन’. हा क्रमांक पाकिस्तानमधील असल्याचे सांगितले जात आहे. डॉ. अन्नपूर्णा भारती यांनी गांधी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, ते त्यांच्या सुरक्षेसाठी शक्य ते सर्व पाऊल उचलतील.

डॉ. अन्नपूर्णा भारती यांनी सांगितले की, त्यांना यापूर्वीही अनेक वेळा अज्ञात क्रमांकावरून जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये तक्रार नोंदवण्यात आल्या आहेत; मात्र पोलिसांना अद्याप धमकी देणार्‍या लोकांचा शोध घेता आलेला नाही. आता त्यांनी पोलिसांकडे संरक्षणाची विनंती केली आहे.