SC On AIMIM : ए.आय.एम्.आय.एम्.ची नोंदणी रहित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली

(ए.आय.एम्.आय.एम्. म्हणजे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन, अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ)

नवी देहली : ए.आय.एम्.आय.एम्.ची ‘राजकीय पक्ष’ म्हणून नोंदणी रहित  करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वाेच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायालयाने म्हटले की, ए.आय.एम्.आय.एम्.च्या घटनेनुसार अल्पसंख्यांकांसह समाजातील प्रत्येक मागासवर्गासाठी काम करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. घटनेतही याचा उल्लेख आहे.

तिरुपती नरसिंह मुरारी यांनी ही याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. यामध्ये देहली उच्च न्यायालयाच्या १६ जानेवारी २०२५ या दिवशी देण्यात आलेल्या आदेशाला आव्हान देण्यात आले होते. यात ए.आय.एम्.आय.एम्.ची नोंदणी आणि मान्यता यांना  आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली होती. या वेळी मुरारी यांच्या वतीने अधिवक्ता  विष्णु शंकर जैन यांनी युक्तीवाद केला होता.

न्यायालयाने अधिवक्ता जैन यांना ही याचिका मागे घेण्यास सांगितले. तथापि खंडपिठाने याचिकाकर्त्याला एक रिट याचिका (याचिकाकर्त्याने प्रविष्ट केलेली याचिका, ज्यामध्ये त्याने एखादी समस्या सोडवण्यासाठी त्याने न्यायालयीन हस्तक्षेप करण्याची मागणी केलेली असते.) प्रविष्ट करण्याची अनुमती दिली ज्यामध्ये तो विविध सूत्रांवर राजकीय पक्षांच्या संदर्भातील सुधारणांसाठी अपील करू शकतो.

सर्वाेच्च न्यायालयाने सुनावणीच्या वेळी मांडलेली सूत्रे

१. काही राजकीय पक्ष जातीच्या आधारावर भेदभाव करतात, जे देशासाठी तितकेच धोकादायक आहे. हे मान्य नाही.

२. इस्लामी शिक्षण देण्यात काहीही चुकीचे नाही. जर देशात अधिकाधिक राजकीय पक्षांनी शैक्षणिक संस्था स्थापन केल्या, तर आम्ही त्याचे स्वागत करू. यात काहीही चुकीचे नाही. जर निवडणूक आयोगाने वेद, पुराण, शास्त्र किंवा कोणत्याही धार्मिक ग्रंथाची शिकवण यांविरोधात असा कोणताही आक्षेप घेतला, तर कृपया योग्य मंचाकडे जा. कायदा त्याची काळजी घेईल. आपले जुने धर्मग्रंथ, पुस्तके, साहित्य किंवा इतिहास वाचण्यात काहीही अयोग्य नाही. कायद्यानुसारही कोणतेही बंधन नाही.

३. जर एखादा राजकीय पक्ष अस्पृश्यतेला प्रोत्साहन देईल, असे म्हणत असेल, तर ते अपमानजनक आहे आणि ते रहित करून बंदी घातली पाहिजे; परंतु जर राज्यघटना धार्मिक कायद्याचे संरक्षण करत असेल आणि पक्ष लोकांना तो शिकवू इच्छितो, असे म्हणत असेल, तर त्यात काहीही चुकीचे नाही.