आक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाई करावी ! – काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर आक्रमण झाल्याचे प्रकरण

मुंबई, १४ जुलै (वार्ता.) – सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड गेले होते. तिथे त्यांच्यावर शाई फेकून आक्रमण करण्यात आले. त्यांना गाडीतून बाहेर खेचून काळे फासण्यात आले. त्यांचा जीव घेण्याचा हा प्रयत्न होता, असा आरोप करत आक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी १४ जुलै या दिवशी विधानसभेत केली. या प्रश्नी वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता. याला उत्तर देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रवीण गायकवाड यांच्यावर आक्रमण करणार्‍या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, गायकवाड यांच्यावर आक्रमण करणारा हा एका पक्षाचा कार्यकर्ता असून त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. त्याच्यावर पिस्तूल बाळगण्याचा गुन्हा नोंद आहे. त्याने चुलत भावाची हत्या केली; म्हणून कारावासही भोगला आहे. एका पक्षाचा तो कार्यकर्ता असून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आक्रमणाची माहिती गुप्तचर विभागाला नव्हती का ? या कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त का नव्हता ?

गायकवाड यांच्यावरील आक्रमणाशी भाजपचा संबंध नाही ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री

‘शिवधर्म फाउंडेशन’चे दीपक काटे यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकून त्यांच्या तोंडाला काळे फासले होते; मात्र प्रवीण गायकवाड यांच्यावर आक्रमण करणारा दीपक काटे हा भाजपचा सक्रीय पदाधिकारी असल्याचा आरोप होत आहे; मात्र महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘या प्रकरणाशी भाजपचा काहीही संबंध संबंध नाही’, असे स्पष्ट केले आहे.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अशा खालच्या पातळीवरचे कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही. प्रवीण गायकवाड यांच्याविषयी झालेल्या घटनेची पोलिसांनी चौकशी करायला हवी. याच्याशी आमचा संबंध नाही. दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता आहे; पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तो कोणत्याही पक्षाचा असला, तरी तो आरोपी आहे.