पुणे रेल्वेस्थानकाला ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ असे नाव द्या !

भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांची मागणी

पुणे – शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी पुणे रेल्वेस्थानकाला ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. पुणे आणि सोलापूर रेल्वे विभागाची बैठक येथे पार पडली. त्या बैठकीला पुणे आणि सोलापूर येथील खासदार उपस्थित होते. त्या वेळी कुलकर्णी यांनी या मागणीचा पुनरुच्चार केला.

पुण्याला बाजीराव पेशव्यांसारखा इतिहासातील महान सेनानी लाभलेला असून त्यांच्या कार्याला गौरवण्यासाठी पुणे रेल्वेस्थानकाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशा प्रकारची मागणी अनेक संघटनांनी यापूर्वी अनेकदा केलेली आहे. कुठल्याही रेल्वेस्थानकाचा, विमानतळाचा भारतातील त्याच्या इतिहासाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न असतो. जेणेकरून नागरिकांनाही आपला दैदिप्यमान इतिहास समजला पाहिजे. पुणे रेल्वेस्थानक पाहिल्यानंतर असा कुठलाही इतिहास त्यातून प्रतिबिंबित होत नाही, असेही त्या या वेळी म्हणाल्या.