सांगली जिल्हा परिषदेने योगदिनी साधला विश्वविक्रमी ‘भक्तीयोग’ !

५ लाख ५० सहस्र योगप्रेमींचा सहभाग !

‘जागतिक योगदिना’निमित्त योग करतांना मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुधीर गाडगीळ आणि इतर मान्यवर

सांगली, २१ जून (वार्ता.) – ‘जागतिक योगदिना’चे औचित्य साधून सांगली जिल्हा परिषदेने विश्वविक्रमी भक्तीयोग साधला. यात त्यांना चितळे डेअरी आणि विश्व योगदर्शन केंद्र यांची साथ लाभली. एकाच वेळी प्रत्यक्ष आणि दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील १ सहस्र ६०० हून अधिक केंद्रावर ५ लाख ५० सहस्र योगप्रेमी सहभागी झाले होते. ‘व्यक्तींनी केलेला योग’ या नावाने हा विश्वविक्रम वर्ल्ड रेकॉर्ड्स् बुक ऑफ इंडिया, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स्, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स्मध्ये नोंदला गेला. या वेळी विमान दुर्घटनेतील मृत्यूमुखींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

‘जागतिक योगदिना’निमित्त योग करतांना मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुधीर गाडगीळ आणि इतर मान्यवर

१. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये आयोजित ‘भक्तीयोग-तालवारकरी योगकरी आरोग्य पंढरी’ या जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे होते.

२. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम झाल्याविषयी त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी मंत्री गोरे यांच्या हस्ते तृप्ती धोडमिसे यांना वर्ल्ड रेकॉर्डस् बुक, आशिया बुक आणि इंडिया बुकमध्ये झालेल्या विश्वविक्रमाविषयी प्रमाणपत्र आणि पदक देण्यात आले.

परेश पेठे प्रस्तुत ‘स्वरवैभव क्रिएशन, सांगली’ यांच्या वतीने मूळ कार्यक्रमापूर्वी भक्तीगीतांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमानंतर मनोहर सारडा यांच्या वतीने उपस्थित वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने भक्तीरसाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

या वेळी काँग्रेसचे खासदार विशाल पाटील, भाजपचे आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, ‘चितळे डेअरी’चे गिरीश चितळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. ‘विश्व योग दर्शन केंद्रा’चे योगविशारद बालकृष्ण चिटणीस, अंजली चिटणीस, हर्षद गाडगीळ, शैलेश कदम आणि त्यांचे सहकारी यांनी योगसाधनेची प्रात्यक्षिके सादर केली.