RBI Report On Banking Frauds : देशभरातील बँक खात्यांतून ३६ सहस्र कोटी रुपये लंपास

नवी देहली – देशात आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये बँकेतील फसवणुकीच्या २३ सहस्र ९५३ घटना घडल्या असून यातून तब्बल ३६ सहस्र १४ कोटी रुपये लंपास करण्यात आले, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तिच्या वार्षिक अहवालात दिली आहे. ही आकडेवारी १ लाख किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या घोटाळ्यासाठी आहे.

विशेष म्हणजे आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तुलनेत २०२३-२४ मधील घटना ३४ टक्के अल्प आहेत. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये खासगी क्षेत्रात बँकेत आर्थिक फसवणुकीचे सर्वाधिक म्हणजे १४ सहस्र २३३ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सरकारी बँकांनी २५ सहस्र ६६७ कोटी रुपये म्हणजेच एकूण ७१.३ टक्के, तर खासगी बँकांनी १० सहस्र ८८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची नोंद केली आहे.

नोटा छापणे झाले महाग !

या अहवालात नोटा छपाईसाठी करण्यात येणार्‍या खर्चात २५ टक्के वाढ झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये नोटांच्या छपाईवर करण्यात आलेला एकूण खर्च ६ सहस्र ३७२ कोटी ८० लाख रुपये झाला आहे. गेल्या वर्षी हा खर्च ५ सहस्र १०१ कोटी ४० लाख रुपये होता. आता २ रुपये, ५ रुपये आणि २ सहस्र रुपये या मूल्यांच्या नोटा छापल्या जात नाहीत, अशी माहिती यात देण्यात आली आहे. २०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटांमध्ये वाढ झाल्याचे यात म्हटले आहे.