पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास सहकार्य करण्याचे महावितरणचे जनतेला आवाहन

खंडित वीजपुरवठा सुरळीत करणे, ही वेळ लागणारी प्रक्रिया असल्याचे केले स्पष्ट

प्रतीकात्मक छायाचित्र

सिंधुदुर्ग – पावसाळ्यात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंते आणि जनमित्र प्रयत्न करत असतात. प्रतिकूल परिस्थितीत रात्री-अपरात्री दुरुस्तीचे काम करण्याचे काम अतिशय आव्हानात्मक असते. अशा परिस्थितीत काम करणे सर्वांना धोकादायक असते. रात्री-अपरात्री खंडित विजेतील बिघाड शोधणारे, अविश्रांत दुरुस्तीचे काम करणारे अभियंते आणि जनमित्र यांसाठी पावसाळ्याचा कालावधी अतिशय आव्हानात्मक आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास वीज ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वीज वितरण आस्थापनाने (महावितरणने) केले आहे.

याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या वर्षी पावसाचे लवकरच आगमन होईल, अशी सध्या स्थिती आहे; मात्र पाऊस अवेळी मोठ्या प्रमाणात पडू लागल्याने निर्माण होत असलेल्या विविध कारणांमुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यावर परिणाम होत आहे. वीजपुरवठा खंडित होणे, हे वीजग्राहकांना जेवढे नकोसे आहे, तेवढेच महावितरणचे अभियंते आणि कर्मचारी यांनाही नकोसे आहे. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अभियंते आणि कर्मचारी रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहेत; परंतु कोणत्याही कारणाने वीजपुरवठा खंडित झाल्यास सर्वप्रथम पर्यायी वीजयंत्रणेमधून वीजपुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. काही वेळा सुरक्षेच्या कारणास्तव आपत्कालीन स्थितीत वीजपुरवठा बंद करावा लागतो. काही वेळा भूमीगत वीज वाहिन्यांमध्येही काही कारणांमुळे दोष निर्माण होऊन वीजपुरवठा खंडित होतो. अशा खंडित प्रवाहाची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे याला अधिक वेळ लागतो. तरीही महावितरणचे कर्मचारी अशी कामे कोणतीही विश्रांती न घेता करत असतात. तरीही वीजपुरवठा खंडित झाल्यास अथवा कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास अथवा काही माहिती विचारण्यासाठी वीजग्राहकांनी १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे २४ घंटे सेवा उपलब्ध असलेल्या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क करावा. खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करण्यासाठी नोंदणीकृत भ्रमणभाषवरून ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर ‘मिस्ड् कॉल’ देण्याची किंवा वीज खंडित झाल्याचा संदेश ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठवण्याची सोय उपलब्ध आहे.