नवी देहली – ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकला समर्थन देणार्या अझरबैझानचा शत्रू असणार्या आर्मेनियाला भारताकडून होणारा शस्त्रास्त्रांचा पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत आर्मेनियाला ‘आकाश १-एस्’ क्षेपणास्त्र प्रणालीची दुसरा पुरवठा करणार आहे. ‘आकाश १-एस्’ हे भूमीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये याचा पहिल्यांदा आर्मेनियाला पुरवठा करण्यात आला होता.
१. भारत आर्मेनियाला हॉवित्झर तोफा आणि पिनाका मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टमसह विविध प्रकारची शस्त्रे पुरवण्याच्या योजनेवरही काम करत आहे. रशिया अनेक वर्षांपासून आर्मेनियाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार आहे; परंतु आता दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये दरी दिसून येत आहे. आर्मेनियाने भारताकडून वर्ष २०२२ ते २०२४ या काळात त्याच्या एकूण शस्त्रास्त्र खरेदीपैकी ४३ टक्के खरेदी केली.
२. आर्मेनिया आणि अझरबैझान शेजारील देश असून त्यांच्यात कट्टर वैर आहे. अझरबैझानचे पाकिस्तान आणि तुर्कीये यांच्याशी जवळचे संबंध आहेत, तर आर्मेनियाचे भारताशी चांगले संबंध आहेत. वर्ष २०२० पासून भारत आणि आर्मेनिया सरकारमधील संरक्षण संबंध सातत्याने वाढत आहेत.