गोव्यात हिंदूंना पोर्तुगीज कायद्यानुसार २ बायका करता येतात. सरकार कायद्यात पालट करणार का ?

‘गोव्यामध्ये हिंदूंना एकाच वेळेस २ बायका करता येतात’, असे मी म्हणत नाही; परंतु गोव्यातील ‘पोर्तुगीज सिव्हिल कोड’नुसार (पोर्तुगीज समान नागरी कायद्यानुसार) अजूनही २ बायका ‘जेन्टायल हिंदू’ला (परराष्ट्रीय हिंदूंना) करता येतात, असे कायदा तरी तसे सांगतो. गोवा स्वतंत्र झाला पोर्तुगिजांच्या जोखडातून. पोर्तुगिजांनी जो ‘पोर्तुगीज सिव्हिल कोड’ लिहिला, त्यामध्ये लग्न, ‘प्रॉपर्टी मेंटेनन्स’ (मालमत्ता देखभाल), ‘चाईल्ड कस्टडी’ (लहान मुलांचा ताबा) यांसारखे विषय कायद्याच्या स्वरूपात लिहिलेले आहेत. वर्ष १९६१ मध्ये गोवा पारतंत्र्यातून मुक्त झाला, त्या वेळेस ‘पोर्तुगीज सिव्हिल कोड’ पडताळून आपल्याला जे कायदे उपयुक्त होते, ते तसेच ठेवण्यात आले. संपूर्ण भारतावर इंग्रजांचे राज्य होते आणि त्यांची भाषा इंग्रजी होती. त्यामुळे कायदेही इंग्रजी भाषेतच लिहिले गेले. तेच कायदे आपण सुधारणा करत आपण अजूनही ते वापरतो.

 दुसर्‍या लग्नाविषयीचा कायदा आणि प्रावधाने

पोर्तुगिजांचे कायदे पोर्तुगीज भाषेमध्ये होते. त्याचा अर्थ अजूनही समजत नाही. त्यामुळे वर्ष १९६१ नंतर पोर्तुगीज भाषेचे तंतोतंत भाषांतर इंग्रजी भाषेमध्ये करण्यात आले. त्यानंतर येथे नेमके कायदे काय आहेत, हे कळू लागले. ‘फॅमिली लॉ ऑफ गोवा, दमण आणि दीव’ असा एक खंड आहे, ज्यात गोमंतकीय जनतेचे तसेच दीव-दमण येथील लोकांसाठी लग्न, घटस्फोट, मुले, वारसा आणि मालमत्ता या विषयांवर कायदे लिहिलेले आहेत. मूळ कायदा हा ‘पोर्तुगीज सिव्हिल कोड १८६७’, असा आहे. ज्यामध्ये सर्वच प्रावधाने आहेत. वर्ष १८८० मध्ये विस्काउंट जोनारीओ या गोवा प्रांत प्रदेशाध्यक्षाने ‘कोड ऑफ जेन्टील हिंदू यूसेज अँड कस्टम्स १८८० इन पर्टीक्युलस जॉईंट हिंदू इन्स्टिट्यूशन’, हा कायदा पारित केला. यामध्ये १ ते ३२ अशी प्रकरणे असून यातील प्रकरण ३ मध्ये पहिले लग्न करण्याचा अधिकार ‘हिंदू जेन्टायल’ पुरुषाला प्रदान केला आहे. याला ‘सायमलटेनस मॅरेज’ (दुसरा विवाह) असे संबोधलेले आहे. यातील प्रावधानांनुसार ‘पहिल्या पत्नीला तिचे वय २५ वर्षे होईपर्यंत जर मूलबाळ होत नसेल, तसेच तिच्या वयाच्या ३० वर्षांपर्यंत तिला मुलगा अपत्य झालेले नसेल’, अशा अटींनुसार हिंदु पुरुष दुसरा विवाह करू शकतो.

अधिवक्ता शैलेश कुलकर्णी

कायद्यामुळे न्यायालयाच्या पुढेही पेचप्रसंग

हे मी माझ्या मनाचे सांगत नाही; परंतु अजूनही कायद्याच्या पुस्तकात ही सर्व प्रकरणे समाविष्ट आहेत आणि याच गोव्यातील घटनेनुसार ‘कॉमन सिव्हिल कोड’सुद्धा आहे. हा पूर्णपणे विरोधाभास आहे. कायदे रहित अथवा ‘रिपील’ (पुनर्विचार) करायचे अधिकार त्या त्या सरकारला असतो; पण दुर्दैवाने ते कायदे अजूनही पालटले गेलेले नाहीत. एखाद्या घटस्फोटाच्या खटल्यामध्ये जर न्यायालयात वर उल्लेख केलेले प्रकरण दाखवण्यात आले, तर न्यायालयातही एक पेचप्रसंग निर्माण होईल.

सरकार, अधिवक्ते आणि बार कौन्सिल यांनी कायद्यात पालट करावा !

‘कोड ऑफ जेन्टील हिंदू यूसेज अँड कस्टम्स १८८० इन पर्टीक्युलस जॉईंट हिंदू इन्स्टिट्यूशन’ या कायद्यातील प्रकरण ३ आणि ४ स्पष्टपणे घटस्फोट न घेता दुसरे लग्न करण्याविषयीची प्रावधाने लिहिलेली आहेत. ही प्रावधाने त्वरित रहित वा ‘रिपील’ करण्यात आली पाहिजेत. ‘युनिफॉर्म सिव्हिल कोड’नुसार गोमंतकियांना एकच भार्या करण्याची मुभा असतांना हा जुना कायदा अस्तित्वात आहे. अधिवक्ते आणि बार कौन्सिल यांच्या सदस्यांनी याचे मार्गदर्शन सरकारला अधिवेशनाच्या कार्यकाळात करावे.

– अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, कुर्टी, फोंडा, गोवा.