अनधिकृत फलक न लावण्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आवाहन

कसबा पेठ मतदारसंघात स्वच्छता अभियानाला प्रारंभ

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे – कसबा पेठ मतदारसंघात स्वच्छतेसाठी अभियान चालू झाले आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आमदार हेमंत रासने यांनी अनधिकृत फलकमुक्त कसब्याची घोषणा केली आहे. याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रतिसाद द्यावा, कुणीही अनधिकृत फलक लावू नयेत, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. कसबा पेठ मतदारसंघात आयोजित ‘स्वच्छता नारायण महापूजा’ कार्यक्रमात मोहोळ बोलत होते. या वेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त संदीप कदम, पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल आदी उपस्थित होते.

स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा अभियान उपक्रमांतर्गत रमणबाग प्रशालेजवळील बंद करण्यात आलेल्या उकिरड्याच्या (क्रॉनिक स्पॉट) ठिकाणी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. स्वच्छतेच्या वस्तूंची विधीवत पूजा करण्यात आली. रासने यांच्या पुढाकारातून महापालिकेने मतदारसंघातील २६ उकिरडे बंद केले आहेत. त्या ठिकाणी ‘स्वच्छता नारायण महापूजा’ करण्यात आली. या वेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, रासने यांच्या स्वच्छतेच्या ध्यासामुळे कसबा मतदारसंघात हे अभियान यशस्वी होईल. हेमंत रासने यांनी सांगितले की, मतदारसंघातील २६ उकिरडे आपण बंद केले आहेत. आता पुढील ८ दिवसांत सार्वजनिक ठिकाणी लावलेले सर्व अनधिकृत फलक काढून टाकले जातील.