प्रयागराज – तीर्थराज प्रयागराज येथे २६ फेब्रुवारी या दिवशी महाकुंभपर्वाची सांगता झाली. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या या पर्वामध्ये तब्बल ६६ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगम आणि गंगा नदीमध्ये अनन्य श्रद्धेने स्नान केले. आतापर्यंतच्या कुंभमेळ्यांमध्ये आलेल्या भाविकांच्या संख्येचे सर्व उच्चांक या महाकुंभपर्वाने तोडले आहेत, किंबहुना प्रयागराजमध्ये झालेला आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा धार्मिक सोहळा ठरला आहे.
२६ फेब्रुवारी या एकाच दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत १ कोटी ३२ लाख भाविकांनी कुंभस्नान केले होते. उत्तरप्रदेश शासनाने ‘दिव्य-भव्य-डिजीटल महाकुंभ’ असे या महाकुंभपर्वाचे विज्ञापन केले होते. १४४ वर्षांनी आलेल्या या महापर्वामध्ये ४० ते ४५ कोटी भाविक सहभागी होतील, असा अनुमान शासनाकडून वर्तवण्यात आला होता; मात्र त्याहून कितीतरी अधिक भाविकांचा प्रतिसाद महाकुंभपर्वाला लाभला. मौनी अमावास्येला, म्हणजे अमृत स्नानाच्या दिवशी झालेल्या दुदैर्वी दुर्घटनेमध्ये काही भाविकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर भाविकांचा ओघ ओसरेल, असे अनुमान लावले जात होते; मात्र त्यानंतरही कोट्यवधी भाविकांनी संगमतिरी येऊन स्नान केले.
सर्वच क्षेत्रातील मान्यवरांचे स्नान !
धार्मिक क्षेत्रासह राजकारणी, अभिनेते, क्रीडाक्षेत्र, कला, विज्ञान, उद्योग आदी क्षेत्रांतील विविध मान्यवरांनी संगमस्नान केले. सत्ताधारी, विरोधी पक्ष आदी सर्वच राजकीय नेते स्नानासाठी महाकुंभपर्वात आले होते.
‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा उद्घोष ठरला केंद्रबिंदू !
महाकुंभपर्वामध्ये सर्व संत, महंत, आखाडे, आध्यात्मिक संस्था यांनी ‘भारत हिंदु राष्ट्र व्हावे’, यासाठी केलेला उद्घोष हा संपूर्ण महाकुंभपर्वाचा केंद्रबिंदू ठरला. पदयात्रा, धर्मसंसद, फलक, यज्ञयाग, स्वाक्षरी मोहीम आदी विविध मार्गांनी महाकुंभपर्वामध्ये हिंदु राष्ट्राचा उद्घोष झाला.
कुंभमेळ्यातील लक्षवेधी !
१. कुंभमेळ्यानंतर काशी, अयोध्या, मथुरा या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी कोट्यवधी भाविकांची गर्दी वाढली.
२. महाकुंभपर्वामध्ये वाहतुकीची कोंडी या विषयावर अधिक चर्चा झाली.
३. सामाजिक माध्यमांवरून हिंदुविरोधी शक्तींनी महाकुंभपर्वाच्या ठिकाणी अस्वच्छता, अश्लीलता असल्याविषयी अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला सर्वच स्तरांवरून भाविकांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे महाकुंभपर्वाची अपकीर्ती करण्याचे षड्यंत्र विफल ठरले.
४. काही प्रसारमाध्यमांनी महाकुंभपर्वातील धार्मिकता दाखवण्याऐवजी प्रसिद्धीलोलुप कथित व्यक्तींची वृत्ते सातत्याने देऊन महाकुंभपर्वाची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न केला.