
दोडामार्ग – तालुक्यातील तिलारी आंतरराज्य धरणामुळे प्रकल्पबाधित झालेली गावे पुनर्वसनाच्या गोंडस नावाखाली अन्यत्र वसवण्यात आली आहेत. या गावांसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मार्च महिन्यापासून पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे या धरणाचा या
गावांना, तसेच दोडामार्ग तालुक्याला म्हणावा तसा लाभ झालेला नाही. आजही धरणाजवळच्या अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो, ही शोकांतिका आहे. त्यामुळे या गावांना तिलारी धरणाचे पाणी सुरळीत कसे मिळेल, यासाठी त्वरित योग्य नियोजन करावे. यासाठी प्रकल्पबाधित शेतकर्यांनी आंदोलन उभे केल्यास त्याला मनसेचा पूर्ण पाठिंबा असेल, असे मनसेचे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता अनिल केसरकर यांनी सांगितले आहे.
प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविषयी अधिवक्ता केसरकर यांनी सांगितले की, धरणाचा डावा आणि उजवा कालवा दुरुस्तीच्या नावाखाली काही ठेकेदार आणि अधिकारी मालामाल झाले आहेत. धरणाच्या दुरुस्तीच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्यामुळे आजही कालवे फुटून
शेतकर्यांची हानी होत आहे. या धरणाचे पाणी स्थानिकांना मिळत नसतांना वेंगुर्ला तालुक्यात पर्यावरणाची प्रचंड हानी करणार्या खाण आस्थापनांना पाणी कसे मिळेल ? यासाठी प्रयत्न केले जात होते. खाण आस्थापनांऐवजी दोडामार्ग तालुक्यातील पिकुळे, खोक्रल, उसप, झरेबांबर, केर, मोर्ले, माटणे यांसह अन्य गावांतील शेतकर्यांना धरणाचे पाणी कसे सुरळीत मिळेल, याचा अधिकार्यांनी अभ्यास करावा आणि योग्य नियोजन करावे, अन्यथा धरण दुरुस्तीच्या नावाखाली स्वत:च्या तुंबड्या भरणार्या अधिकारी वर्गाला खडसावावे लागेल, असे अधिवक्ता केसरकर यांनी म्हटले आहे.