१८ वर्षांच्या मुलाशी अश्लील चाळे !
पनवेल – कामोठे येथील एका रुग्णालयातील वॉर्डबॉयने १८ वर्षांच्या मुलासमवेत अश्लील चाळे केले. या प्रकरणी गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.
उड्डाणपुलाच्या भिंतीला तडा !
उरण – नवी मुंबई, पनवेल महामार्गावर नुकत्याच बांधलेल्या करळ येथील उड्डाणपुलाच्या भिंतीला तडा गेला आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी पुलाची पहाणी करून दुरुस्तीचे आदेश दिले.
खंडणी मागणारा अटकेत !
मुंबई – अश्लील छायाचित्राद्वारे धमकावून २७ वर्षीय तरुणीकडे खंडणीची मागणी करणार्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. आरोपीने पीडित मुलीच्या नातेवाईकाला तिचे अश्लील छायाचित्र पाठवून तिची अपकीर्तीही केली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लोकलगाड्या झुकून प्रवाशांचा तोल जातो
ठाणे – कळवा, मुंब्रा आणि दिवा रेल्वेस्थानकाच्या मध्ये होणार्या प्रचंड गर्दीमुळे वेगाने धावणार्या लोकलगाड्या काही अंशांनी डावीकडे आणि उजवीकडे झुकतात. परिणामी दरवाज्याजवळ डब्याच्या आतील बाजूस उभ्या असलेल्या प्रवाशांचा तोल जाऊन ते डब्याबाहेर फेकले जातात. काहीवेळा दुर्घटना घडून यामध्ये अनेक प्रवासी गंभीर घायाळ होत आहेत, काही जणांचा मृत्यूही होत आहे, अशी माहिती मराठी एकीकरण समितीचे (महाराष्ट्र राज्य) उपाध्यक्ष आनंदा पाटील यांनी रेल्वेचे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक आणि रेल्वे मंत्रालय यांच्याकडे पाठवली.
संपादकीय भूमिका : रेल्वे प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करायला हवी !
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्रिवेणी संमगावर पवित्र स्नान
प्रयागराज – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब आणि मंत्री यांच्यासह त्रिवेणी संमगावर पवित्र स्नान केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘येथे ६० कोटी लोक आले. कुणालाही काहीही त्रास झाला नाही. स्वच्छता कर्मचार्यांपासून या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा संपूर्ण चमू या कामात गुंतला आहे. हा मोठा ‘गिनिज बुक रेकॉर्ड’ (विश्वविक्रम) आहे. हा जगातील सर्वांत मोठा महाकुंभ आणि सर्वांत मोठा समागम आहे. येथे येणारा चांगले विचार आणि ऊर्जा घेऊन जाईल.’’
१० मार्चला अर्थसंकल्प !
मुंबई – विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. १० मार्चला विधानसभा आणि विधान परिषद या विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. २३ फेब्रुवारी या दिवशी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या वेळी अधिवेशन समाप्तीचा अंतिम दिनांक घोषित करण्यात आला. ८ मार्च या दिवशी सार्वजनिक सुटीच्या दिवशी कामकाज चालू रहाणार आहे, तर १३ मार्च या होळीच्या दिवशी अधिवेशनाला सुटी असणार आहे.