मुंबई, २० फेब्रुवारी (वार्ता.) – महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्च या दिवशी चालू होऊन ते २१ मार्चपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेत्याची निवड करण्याविषयी विरोधी पक्षांकडून अद्याप विधानसभेच्या अध्यक्षांकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प मांडल्या जाणार्या या महत्त्वपूर्ण अधिवेशनातही विरोधी पक्षनेता नसणार, अशी शक्यता आहे.
महाराष्ट्रात बहुमताने महायुती सरकार आल्यावर वर्ष २०२४ मध्ये नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन पार पडले; मात्र विधानसभेत विरोधी पक्षनेत्यासाठी असलेले आमदारांचे १० टक्के संख्याबळही नसल्यामुळे नियमानुसार हिवाळी अधिवेशन विरोधी पक्षाविना झाले होते. विरोधी पक्षांच्या आमदारांचे संख्याबळ अल्प असले, तरी ‘विरोधी पक्ष पद द्यायचे कि नाही’, याविषयीचा निर्णय सत्ताधारी पक्षाला घेता येतो. असे असले, तरी सभागृहाची परंपरा लक्षात घेऊन सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षनेत्याला अनुमती देण्याची शक्यता अल्प आहे. हे लक्षात घेऊन विरोधी पक्षांकडून अद्याप विधानसभा अध्यक्षांकडे अर्ज करण्यात आलेला नाही.