Security Tightened For Kumbh Snan : संगमतिरी 3 फेब्रुवारी या दिवशी तिसरे अमृत स्नान; पोलीस आणि प्रशासन सज्ज !

दुर्घटनेतून धडा घेत चोख व्यवस्था !

श्री. नीलेश कुलकर्णी, विशेष प्रतिनिधी, प्रयागराज

प्रयागराज, २ फेब्रुवारी (वार्ता.) – येथे २९ जानेवारीला द्वितीय अमृत स्नानाच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दृर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर वसंत पंचमीच्या मुहुर्तावर, म्हणजेच ३ फेब्रुवारी या दिवशी साधू-संतांचे तिसरे आणि शेवटचे अमृत स्नान होणार आहे. यापुढे १२ फेब्रुवारी आणि २६ फेब्रुवारी या दिवशी असलेले स्नान ही पर्व स्नान आहेत. २९ जानेवारी या दिवशी झालेल्या दुर्घटनेत ३० भाविकांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते, तर ९० जण घायाळ झाले. त्यामुळे केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकार यांच्यावर टीकेची झोड उठली होती. या पार्श्‍वभूमीवर तिसरे अमृत स्नान सुरळीतपणे पार पाडण्याचा प्रशासनावर चांगलाच ताण आहे.

पोलीस आणि प्रशासन सज्ज

या अमृत स्नानाच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस-प्रशासनाने२ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत कुंभक्षेत्री वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यासह अतीमहनीय व्यक्तींसाठी असलेले पास (व्हीआयपी पास) निरस्त केले आहेत. ‘२९ जानेवारीला याच ‘व्हीआयपी पास’मुळे अतीमहनी व्यक्तींच्या सुरक्षेत पोलीस अडकले आणि त्यांचे सर्वसामान्य भाविकांच्या व्यवस्थेकडे दुलर्क्ष झाल्यामुळे दुर्घटना घडली’, असा अरोप विरोधी पक्षांनी केला. त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यासह सर्व ३० पांटून पूल (नदीवरून ये-जा करण्यासाठी बांधण्यात येणारे तात्पुरते पूल) सर्वसामान्य भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. मागील वेळी बहुतांश पूल बंद ठेवल्याने एकाच ठिकाणी गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाली होती.

३ फेब्रुवारी या दिवशी साधू-संतांचे तिसरे आणि शेवटचे अमृत स्नान

साधू-संत आणि भाविक यांच्यामध्ये प्रचंड उत्साह !

दुर्घटनेनंतरही आजपर्यंत प्रतिदिन लाखो भाविक गंगास्नान करत आहेत. आतापर्यंत एकूण जवळपास ३४ कोटी भाविकांनी गंगास्नान केले आहे. यावरून ‘दुर्घटनेचा भाविकांवर कुठलाही नकारात्मक परिणाम झालेला नाही’, असेच दिसून येते. तिसर्‍या अमृत स्नानासाठी साधू-संत आणि भाविक यांच्यामध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. ‘आमच्या (श्री पंचायती निरंजनी) आखाड्यात वसंत पंचमीच्या मुहुर्तावरील अमृत स्नानाची जोरदार सिद्धता चालू आहे. आमचे रथ सजत आहेत. सर्व संत स्नानासाठी जाणार आहेत. आम्ही सर्व जण उद्याचे स्नान उत्साहात व्हावे, यासाठी प्रयत्नरत आहोत. वसंत पंचमीचे स्नान हे ऊर्जेचे स्नान आहे’, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमहंत रवींद्रपुरीजी महाराज यांनी व्यक्त केली.

तिसरे अमृत स्नान सुरळीतपणे पार पाडण्याचा प्रशासनावर ताण

भाविकांनी ‘संगम नोज’वर स्नान करण्याचा हट्ट धरू नये ! – आखाडा परिषद

‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमहंत रवींद्रपुरीजी महाराज म्हणाले, ‘‘गंगा नदी ही ५ कोस (१५ कि.मी.) दूर पसरली आहे. त्यामुळे गंगेच्या पात्रात कुठेही स्नान केले, तरी संगम स्नानाचे फळ मिळेल. ‘संगम नोज’ (स्नानाचे मुख्य ठिकाण) ज्याला म्हणतात, ते प्रत्येकवर्षी पालटत असते. त्यामुळे भाविकांनी संगमस्थळी स्नानाचा हट्ट न धरता जेथे जवळची गंगा नदी असेल, तेथे स्नान करावे. तेथे स्नान केले, तरी पापक्षालन होईल आणि मोक्ष मिळेल.’’

गंगा नदीच्या कोणत्याही घाटावर स्नान केले, तरी अमृतस्नानाचा लाभ मिळणार ! – आचार्य महामंडलेश्‍वर श्री कैलाशानंद पुरीजी महाराज

‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना श्री पंचायती आखाडा निरंजनीचे पीठाधीश्‍वर आचार्य महामंडलेश्‍वर श्री कैलाशानंद पुरीजी महाराज म्हणाले, ‘‘वसंत पंचमीचे अमृतस्नान निर्विघ्नपणे पार पडावे, याकरता आम्ही सतत प्रार्थना करत आहोत. सरकार चांगल्या प्रकारे सिद्धता करत आहे. गंगा नदीच्या कोणत्याही घाटावर स्नान केले, तरी अमृतस्नानाचा लाभ मिळेल. त्यामुळे भाविकांनी संगमावर गर्दी न करता इतर कोणत्याही घाटावर स्नान करावे.