Pakistan Mahakumbh : पाकिस्तानात हिंदूंनी साजरा केला महाकुंभ उत्सव : ‘हर हर महादेव’च्या गजरात केले स्नान !

इस्लामाबाद – प्रयागराजमध्ये चालू झालेल्या महाकुंभाची चर्चा जगभर चालू झाली आहे. महाकुंभमेळ्याच्या कालावधीत जगभरातून आलेले लाखो भाविक गंगेत स्नान करत आहेत. तथापि पाकिस्तानमधील हिंदू व्हिसा संबंधित समस्यांमुळे यामध्ये भाग घेऊ शकत नाहीत. त्यामुळे पाकिस्तानातील हिंदूंनी एका वेगळ्या महाकुंभमेळ्याचे आयोजन केले आहे. यात गंगेच्या पाण्यात स्नान करून ते त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत.

पाकिस्तानी यू ट्यूबर हरचंद राम यांनी त्यांच्या ब्लॉगवर या अनोख्या कार्यक्रमाचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. पाकिस्तानच्या रहिमयार खान जिल्ह्यात हा महाकुंभमेळा साजरा करण्यात येत आहे. महाकुंभात गंगास्नानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे भारतातून गंगेचे पाणी आणून येथील तलावात मिसळण्यात आले आहे. त्यामध्ये स्नान करून हिंदू भाविक गंगास्नानाचा अनुभव घेत आहेत. एका भक्ताचे म्हणणे आहे की, प्रयागराजला जाणे शक्य नसले, तरी गंगेच्या पाण्यात स्नान केल्याने तोच अनुभव येतो.