Special Trains For Mahakumbh : मौनी अमावास्या महापर्वासाठी प्रयागराज रेल्वे मंडळाने २२२ हून अधिक विशेष गाड्या चालवून केला विक्रम !

प्रयागराज रेल्वेने ३६० हून अधिक रेल्वेगाड्यांचे केले संचालन !

रेल्वे स्थानकावर बाहेरील गावाहून आलेले प्रवासी

प्रयागराज, ३० जानेवारी (वार्ता.) – सनातन धर्माच्या महापर्व मौनी अमावास्या या दिवशी तब्बल ८ कोटींहून अधिक भाविकांनी प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले. मागील अनेक दिवसांपासून कोट्यवधी भक्तगण प्रयागराजकडे प्रवास करत होते. प्रयागराज रेल्वे मंडळाने त्यांच्या सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी विक्रमी २२२ विशेष रेल्वेगाड्या आणि नियमित गाड्यांसह ३६० हून अधिक रेल्वेगाड्यांचे संचालन केले. ‘एन्.सी.आर्.’चे महाप्रबंधक उपेंद्र जोशी आणि मंडल रेल्वे व्यवस्थापक हिमांशू बडोनी हे मुख्य केंद्रामधून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवत होते.

प्रवाशांना माहिती देऊन साहाय्य करतांना पोलीस

प्रयागराज रेल्वे प्रशासनाने मौनी अमावास्या अमृतस्नान पर्वासाठी विशेष नियोजन केले होते. प्रयागराज आणि इतर रेल्वे स्थानकांवर आश्रयस्थळे, होल्डिंग क्षेत्र आणि सहज तिकीट वितरण व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली, तसेच जी.आर्.पी आणि सिव्हिल पोलिसांनी संयुक्त नियोजन करून प्रवाशांच्या सुरक्षित हालचालींसाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था केली. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे खुसरोबाग होल्डिंग पॉईंट चालू करण्यात आला. सिव्हिल पोलिसांच्या साहाय्याने यात्रेकरूंना मार्गदर्शन करून प्रयागराज स्थानकावर आणले गेले आणि त्यांच्या गावी जाणार्‍या गाड्यांमध्ये चढवण्यात आले.

  • प्रयागराज जंक्शन (एन्.सी.आर्.) – १०४ रेल्वेगाड्या
  • छिवकी – २३ गाड्या
  • नैनी – १७ गाड्या
  • सूबेदारगंज – १३ गाड्या
  • प्रयाग स्टेशन (एन्.आर्.) – २३ गाड्या
  • फाफामऊ – ५ गाड्या
  • रामबाग (एन्.ई.आर्.) – ९ गाड्या
  • झूंसी – २८ रेल्वेगाड्या