हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित प्रयत्न करण्याची हिंदुत्वनिष्ठांची प्रतिज्ञा !

हडपसर (जिल्हा पुणे), २७ जानेवारी (वार्ता.) – हलाल जिहाद, लव्ह जिहाद, वक्फ बोर्ड, घुसखोरी असे अनेक प्रश्न आणि समस्या आज संपूर्ण देशात आहेत. हिंदूंना शाळेत धर्मशिक्षण दिले जात नाही, अन्य धर्मियांना मात्र शाळेत धर्मशिक्षण दिले जाते. १०० कोटी हिंदूंचे एकही हिंदु राष्ट्र नाही, त्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र असले पाहिजे यासाठी जोरदार मागणी करायला हवी, हे होत नाही; कारण स्वीकारलेले ‘सेक्युलॅरिझम’ (निधर्मीवाद) ! यासाठी आपल्या सर्वांना भारत हे हिंदु राष्ट्र होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी व्यक्त केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील श्री राधाकृष्ण मंदिर, काळेपडळ येथे २६ जानेवारी या दिवशी हिंदु राष्ट्र जागृती सभा पार पडली. त्या वेळी त्यांनी प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन केले. कर्नल व्यंकटराव खडगे (निवृत्त) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. सभेचे सूत्रसंचालन श्री. शुभम डोणावडे यांनी केले. या सभेला १८० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. सचिन घुले हेही सहभागी झाले होते.

विशेष
१. सभेचे आयोजन, प्रसार हे हडपसर येथील सियाराम मंदिर शाखेतील सदस्यांनी उत्स्फूर्तपणे केले. प्रसार सेवेसाठी ८ दिवस प्रतिदिन या भागात एकत्रितपणे प्रसार केला. घरोघरी जाऊन सभेचे निमंत्रण दिले.
२. या वेळी सनातननिर्मित आध्यात्मिक आणि राष्ट्र-धर्म विषय ग्रंथप्रदर्शन लावले होते. त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मंदिर वेळोवेळी उपलब्ध करून देणारे श्री. सुधीरचंद्र जगताप आणि साहाय्य करणारे धर्मप्रेमी श्री. सुरज झांबरे यांचे या वेळी समितीने आभार मानले.