संविधानत्रयी – स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रयींचा भारतियांनी काढलेला चुकीचा अर्थ !
मजबूत प्रजातंत्र असतांनाही भारत आतापर्यंत विकसनशील देशच होता. जो प्रत्येक पावलागणिक विकास करत आहे. आमच्या समवेत स्वतंत्र झालेले जपान आणि इस्रायल हे देश विकासाची विविध शिखरे गाठत असतांना आम्ही मात्र अजूनही ‘कदमताल’च करत आहोत. आम्ही आमच्या विकासाचा वेग का वाढवू शकलेलो नाही ? याचे कारणही आमच्या ‘संविधानत्रयी’तच दडलेले आहे.
१. स्वातंत्र्य : याचा अर्थ आम्ही व्यक्तीगत घेतला आहे. त्यामुळे या स्वातंत्र्याला आम्ही स्वैराचार समजू लागलेलो आहोत. आम्ही हे विसरत आहोत की, व्यक्ती ही समाज, राज्य आणि देश यांचा अविभाज्य घटक आहे. या तिन्ही घटकांचा विचार केल्याविना उपभोगले जाणारे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचारच ठरते. यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या संदर्भात घडलेला किस्सा येथे देत आहेत.

१ अ. स्वातंत्र्याविषयी अब्राहम लिंकन यांचे रोखठोक उद्गार ! : अब्राहम लिंकन एकदा एका छोट्या गल्लीतून जात असतांना समोरून एक जण काठी फिरवत येत होता. अब्राहम लिंकन यांनी ओरडून त्याला काठी फिरवणे थांबवायला सांगितले. तो माणूस लिंकनवर रागावून म्हणाला, ‘‘मी स्वतंत्र देशाचा स्वतंत्र नागरिक आहे. माझ्या काठी फिरवण्याच्या अधिकारावर तुम्ही राष्ट्राध्यक्ष असलात, तरी गदा आणू शकत नाही.’’ लिंकन म्हणाले, ‘‘मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून नव्हे, तर अमेरिकेचा सामान्य स्वातंत्र्यप्रिय नागरिक म्हणून तुला हे सांगत आहे; कारण जिथे माझे नाक चालू होते, तिथे तुझी स्वतंत्रता संपते.’’
१ आ. स्वतःसह दुसर्यांचे स्वातंत्र्य राखा ! : आपण आपले स्वातंत्र्य उपभोगतांना दुसर्याच्या स्वातंत्र्याचाही विचार करायला पाहिजे. आमच्या घरचा कचरा आम्ही सर्रास रस्त्यावर फेकतो. तो उडत रस्ताभर पसरत शेजार्याकडेही जातो. मग शेजारीही असेच करतो. हे दुष्टचक्र अव्याहतपणे चालू रहाते. आम्ही आमचे आणि दुसर्यांचे स्वातंत्र्य राखणे, हा कर्तव्यबोध झाल्याविना आम्ही स्वतंत्र नव्हे, तर स्वैराचारी ठरतो.
१ इ. नदीत स्नान करतांना साबण न वापरणे आणि स्वातंत्र्य ! : नुकताच आम्हाला तेलंगाणा सीमेवरील गोदावरी नदीच्या स्नानाचा योग आला. आम्ही नदीचे स्नान करत असतांना साबण वापरण्याच्या विरुद्ध आहोत; कारण रसायनांनी नद्या प्रदूषित होतात. नदीत आंघोळीला उतरल्यावर तेथील २० जणांना आम्ही त्यांच्या जवळील साबणाला विरोध केला. बहुतेकांनी साबण नेऊन काठावर ठेवले; पण एकजण ऐकतच नव्हता. तेव्हा त्याला आम्ही गणित मांडून दाखवले. आम्ही विचारले, ‘‘दिवसभरात या घाटावर किती लोक आंघोळ करत असतील ?’’ तर तो म्हणाला, ‘‘५ सहस्र लोक !’’ आम्ही म्हटले, ‘‘१ व्यक्ती एका वेळच्या आंघोळीसाठी किती ग्रॅम साबण वापरत असेल ?’’ तर तो म्हणाला, ‘‘अंदाजे तीन ते पाच ग्रॅम.’’ मग त्याला म्हटले, ‘‘३ ग्रॅम साबण x ५००० लोक = १५ सहस्र ग्रॅम साबण एका दिवशी एका घाटावरून नदीत मिसळतो. नदीला ५० घाट असल्याचे गृहित धरले, तर ७५० किलो साबणाचे रसायन एका दिवसाला आपण नदीत टाकत असतो. कपडे धुतांनाही आपण साबण टाकतोच.’’ हे सांगितल्यावर त्याला ते पटले. आमची क्षमा मागून तो साबण किनार्यावर ठेवून आला. अशा प्रकारे आमच्या स्वतंत्रतेचा आधार असायला हवा.
२. समता : समतेचा अर्थ सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे होय. सार्वजनिक वाहनात अपंग आणि वयस्कर यांना प्रथम चढायला देण्याऐवजी धडधाकट युवकच मुसंडी मारून आत शिरतात अन् आसने बळकावतात. समता म्हणजे दुसर्यांचा आदर करणे, हे आपण विसरलो आहोत. सार्वजनिक ठिकाणी वरिष्ठांच्या आदराची तर पार हवा निघालेली असते.
३. बंधुता : ‘हे विश्वचि माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला ।’ या शब्दात माऊली ज्ञानेश्वरांनी बंधुत्वाची व्याख्या केली आहे; पण तिला आपण ‘भाई-भतिजा’ वादात अडकवलेले आहे. अगदी निवडणुकीतही मत देतांना आपण प्रथम उमेदवाराची जात बघतो.
– श्री. किशोर पौनीकर, नागपूर
|
|