Cyber Victim Kerala Ex-Judge : माजी न्यायमूर्ती सायबर फसवणुकीला भुलले !

८५० टक्के परताव्याच्या आशेपोटी गमावले  ९० लाख रुपये !

केरळ उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्तीं शशिधरन् नांबियार

थिरूवनंतपूरम् (केरळ) : केरळ उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्तीं शशिधरन् नांबियार यांनी सायबर फसवणुकीच्या प्रकरणात त्यांच्या बचतीतील ९० लाख रुपये गमावले आहेत. (दिवसेंदिवस सायबर फसवणुकीचे अपप्रकार घडत असतांना पोलीस प्रशासन अशांच्या मुसक्या कधी आवळणार ? – संपादक) माजी न्यायमूर्तींच्या तक्रारीवरून एर्नाकुलम् येथील हिल पॅलेस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायमूर्ती नांबियार यांची वर्ष २००४ मध्ये केरळ उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती झाली होती. ते वर्ष २०१३ ते २०१८ पर्यंत राष्ट्रीय हरित लवादाचे न्यायिक सदस्य होते.

१. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार निवृत्त न्यायमूर्ती प्रथम ‘आदित्य बिर्ला इक्विटी लर्निंग ग्रुप’ नावाच्या ‘व्हॉट्सॲप ग्रुप’मध्ये समाविष्ट झाले आणि त्यांना ‘नलाईन शेअर ट्रेडिंग’मध्ये (समभाग व्यापारामध्ये) ८५० टक्के परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

२. त्यांनी ४ डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत ९० लाख रुपये हस्तांतरित केले आणि त्यांना कोणताही लाभांश दिला गेला नाही किंवा मूळ रक्कमही परत केली गेली नाही. पोलिसांकडील तक्रारीत २ महिलांची आरोपी म्हणून नावे आहेत.