Jallikattu Tragedy : तमिळनाडूमध्ये ‘जल्लीकट्टू’मुळे ७ जणांचा मृत्यू : ४०० जण घायाळ

बैलांचाही मृत्यू

चेन्नई (तमिळनाडू) – ‘पोंगल’ सणाच्या निमित्ताने तमिळनाडूच्या विविध जिल्ह्यांत १६ जानेवारीला आयोजित करण्यात आलेल्या ‘जल्लीकट्टू’ उत्सवात ७ जणांचा मृत्यू झाला, तर ४०० जण घायाळ झाले. पुदुक्कोट्टई आणि शिवगंगाई येथे २ बैलांचा मृत्यू झाला आहे. ज्यांना जीव गमवावा लागला, त्यापैकी बहुतेक लोक खेळात सहभागी नव्हते, तर बैल मालक आणि प्रेक्षक होते. या उत्सवामध्ये गर्दीमध्ये बैल पळवण्यात येत असतो.  या खेळात संपूर्ण राज्यात ६०० हून अधिक बैलांचा समावेश करण्यात आला.

जल्लीकट्टू म्हणजे काय ?

तमिळनाडूमध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी ‘पोंगल’ सण साजरा केला जातो. या दिवशी ते नवीन वर्ष प्रारंभ करतात. ३ दिवस चालणार्‍या सणाच्या शेवटच्या दिवशी बैलांची पूजा केली जाते. ते सुशोभित केले जातात. मग जल्लीकट्टू खेळ चालू होतो. हा खेळ पोंगल सणाचा एक भाग आहे. या खेळात बैलाला गर्दीत सोडले जाते. या खेळात भाग घेणारे लोक बैलाचा खांदा धरून नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. जो बैलाचा खांदा अधिक काळ धरतो, तो विजेता असतो. जल्लीकट्टूचा इतिहास २ सहस्र ५०० वर्षांचा आहे. जल्लीकट्टूचे नाव जल्ली (चांदी आणि सोने यांची नाणी) आणि कट्टू (बांधलेले) या दोन शब्दांपासून बनलेले आहे. जल्लीकट्टूमध्ये जेव्हा बैल मरतो, तेव्हा खेळाडू मुंडन करतात आणि त्याचे अंत्यसंस्कार करतात.