मुंबई – आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे खोटे सांगून ४० जणांची फसवणूक केल्याप्रकरणी रिंकू जीतू शर्मा (वय ३३ वर्षे) याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. बेरोजगारांना आयकर विभागात उच्च पदांवर नोकर्या देण्याचे आश्वासन देऊन त्याने दोन कोटी रुपये उकळले. आयकर विभागात अधिकारी असल्याचे खोटे सांगणार्याला नवी मुंबईतील तळोजा परिसरातून कह्यात घेण्यात आले. आरोपीला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी त्याच्याकडून २८ बनावट (खोटी) ओळखपत्रे जप्त केली आहेत. यामध्ये आयकर विभागाचे साहाय्यक आयुक्त, गृह विभागाचे साहाय्यक आयुक्त आणि सीबीआय विभागाचे पोलीस आयुक्त अशा पदांच्या बनावट ओळखपत्रांचा समावेश आहे. त्याच्याकडून बनावट शिक्के, नियुक्ती पत्र आणि लेटर हेडसह इतर कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
काय आहे प्रकरण ?
१२ डिसेंबर २०२४ रोजी तक्रारदाराने पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आयकर आयुक्त असल्याचे भासवून तक्रारदाराच्या मुलीला प्राप्तीकर विभागात नोकरी लावण्यासाठी फसवले होते. १५ लाख रुपये उकळल्यानंतर त्यांनी बनावट नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र दिले. मुलीला नोकरी न मिळाल्याने फसवणूक उघडकीस आली.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारे फसवणूक करणार्यांवर कठोर कारवाई केल्यासच असे प्रकार न्यून होतील ! |