‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्हाला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत रहाण्याची आणि सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्या वेळी ‘गुरुदेवांना अपेक्षित सेवा कशी करावी ? सेवेत परिपूर्णता कशी असावी ? सेवा करतांना मनाची स्थिती कशी असावी ? सेवा करतांना व्यापकता आणि दृष्टीकोन कसे असावेत ?’, यांविषयी मला श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
समष्टीचा व्यापक विचार करणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ कांचीपूरम् येथे आल्यावर त्या केवळ कांचीपूरम्चा किंवा दौर्याचा विचार करत नाहीत. त्या साधकांच्या साधनेतील अडथळे, साधकांचे आध्यात्मिक त्रास, आश्रमासाठी लागणारे साहित्य इत्यादींविषयीही विचार करतात. त्या अडचणी सोडवण्यासाठी महर्षींना उपाय विचारतात आणि प्रवास करून परिहारासाठी (अडचणी दूर करण्यासाठी) मंदिरात जातात. त्या अशा बारीक-सारीक गोष्टींचा विचार करतात. त्यांच्यामध्ये समष्टीचा व्यापक विचार असतो.
– श्री. स्नेहल मनोहर राऊत
१. साधकांना स्वतःच्या सेवेसमवेत अन्य साधकांच्या सेवेचाही विचार करण्यास शिकवणे
पूर्वी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करतांना केवळ माझ्या विभागातील आणि मला सांगितलेली सेवा करत असे. तेव्हा आश्रमात येता-जाता जे दिसते आणि अन्य साधकांना साहाय्य करणे इत्यादी गोष्टींचा मी विचार करत नसे. ‘मी पूर्णवेळ साधना करणारा साधक आहे, तर मला अन्य साधकांच्या सेवेविषयीही विचार करायला हवा’, हे मला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून शिकायला मिळाले.
२. संपर्कात येणार्या प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने वागण्यास शिकवणे
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ निवासस्थानी येणार्या प्रत्येक व्यक्तीची आपुलकीने विचारपूस करतात. एकदा त्यांनी मला ‘पार्सल’ (कुणीतरी पाठवलेली वस्तू) घेऊन येणार्या व्यक्तीला ‘पाणी हवे का ?’ असे विचारायला सांगितले. तेव्हा ‘एका अनोळखी माणसाला पाण्याविषयी विचारू नये’, असे मला वाटत होते. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्या व्यक्तीला ‘पाणी हवे का ?’, असे विचारले. तेव्हा त्याने ‘होकार’ दिल्यावर मी त्याला पिण्यासाठी पाणी दिले. तेव्हा तो आनंदाने मला म्हणाला, ‘‘आम्हाला असे पाणी विचारणारे तुम्ही पहिलेच आहात.’’ त्यानंतर तो माणूस आमच्याशी जोडला गेला आणि ‘पार्सल आमच्यापर्यंत व्यवस्थित कसे पोचेल ?’, याची काळजी घेऊ लागला. यावरून ‘आपल्या संपर्कात येणार्या व्यक्तीशी प्रेमाने कसे वागायचे ?’, हे मला श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून शिकायला मिळाले.
३. साधकाने निवासस्थानातील अन्य सेवांचे दायित्व घेतल्यावर ‘आश्रम आपला आहे’, असे वाटणे
मी कांचीपूरम् येथील दौर्यासाठी आलो. तेव्हा ‘मी माझ्याकडे सध्या असलेल्या दायित्वाशी संबंधित सेवा केल्या पाहिजेत आणि कांचीपूरम् येथील निवासस्थानातील सेवा अन्य साधकांनी कराव्यात; कारण अन्य सेवा करण्यास मला वेळ नाही’, असे मला वाटत होते. तेव्हा श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आम्हाला म्हणाल्या, ‘‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांनी इथे येऊन सेवा करणे कठीण आहे. त्यांचा वेळ आणि श्रम वाया जातील. त्याऐवजी ‘या निवासस्थानातील अन्य सेवाही माझ्याच आहेत, हे एक कुटुंब आहे’, असा विचार केला पाहिजे. आपणच येथील सेवांचे दायित्व घेतले पाहिजे.’’ त्यानंतर माझा दृष्टीकोन पालटला आणि मला हे निवासस्थान ‘आपले’ वाटू लागले.
४. साधकांना विविध सेवा देऊन साधकांमध्ये व्यापकत्व निर्माण करणे
कांचीपूरम् येथे आल्यापासून आम्ही सर्व प्रकारच्या सेवा करत आहोत, उदा. भाजी आणणे, भाजी निवडणे, स्वयंपाक करणे, धान्य आणून ते साठवणे, अंगण स्वच्छ करणे, झाडांना पाणी घालणे, ग्रंथकक्ष लावणे, समाजातील जिज्ञासू आणि हितचिंतक यांना संपर्क करणे. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यामुळे आमच्यात व्यापकत्व आले आणि आम्हाला ‘हे विश्वची माझे घर ।’, असे वाटू लागले.
५. सक्षम आध्यात्मिक उत्तराधिकारी
काही संस्था किंवा संघटना यांमध्ये संस्था चालवण्यासाठी उत्तराधिकारी होण्यासाठी चढाओढ लागलेली असते. सनातन संस्थेमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणून निवड केली आहे. दोघींमध्ये गुरुदेवांप्रमाणे अनेक समष्टी आणि दैवी गुण आहेत. ‘या दोघीही सक्षम उत्तराधिकारी आहेत’, याची प्रचीती सनातनचे साधक घेत आहेत.
६. अहंशून्यता
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या गुरुदेवांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी आहेत, तरीही त्या लहानसहान सेवा करतात, उदा. स्वयंपाक करणे, विरजण घालणे. त्या आमच्या गुरु असूनही आईप्रमाणे आमची सेवा करतात. यातून त्यांची अहंशून्यता लक्षात येते.
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याविषयी जेवढे लिहू तेवढे अल्पच आहे. त्यांच्याकडून मला जे शिकायला मिळाले, ते येथे थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. ‘असेच आम्हाला त्यांच्याकडून शिकता येऊ दे’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.’
– श्री. स्नेहल मनोहर राऊत (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), कांचीपूरम्, तमिळनाडू (३०.११.२०२४)
साधकाने निवासस्थानी सर्व प्रकारच्या सेवा केल्यामुळे त्याला आनंद मिळणे
माझ्यामध्ये पुरुषी अहंकार असल्याने मला स्वयंपाकघरातील कामे करायला आवडत नसत. कांचीपूरम् येथे आल्यावर मला श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सर्व प्रकारच्या सेवा करण्यास शिकवले, उदा. जेवण बनवणे, विरजण लावणे, ताक करणे, पाहुण्यांना जेवण वाढणे. यामुळे ‘हे निवासस्थान, म्हणजे माझे घर आहे’, असे मला वाटू लागले आणि मला सेवेतून आनंद मिळू लागला.
– श्री. स्नेहल मनोहर राऊत
कुणालाही सहज जाणवणारा मातृत्वभाव !
एकदा तिरुपती विमानतळावर ‘इंडिगो’ आस्थापनाच्या तेथील एका महिलेने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना साडी परिधान केलेले पाहून मातृदिना(मदर्स डे)निमित्त भेटकार्ड दिले. आश्चर्य म्हणजे तेथे साडी परिधान केलेल्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या एकमेव होत्या.
– श्री. स्नेहल राऊत