‘संगीतकला, ग्रंथांसाठी लिखाण, चित्रीकरण करणे, मुलाखती घेणे, सूक्ष्म-जगताचे विश्लेषण करणे, इत्यादी विविध सेवांच्या माध्यमांतून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सेवेला आरंभ केला. ‘प्रगल्भ बुद्धीमत्ता, सूक्ष्मातील कळण्याची अत्युच्च क्षमता आणि परिपूर्ण अन् भावपूर्ण सेवा करण्याची तळमळ’ आदी अनेक गुणांनी त्यांनी सर्वच सेवा कौशल्याने आणि शीघ्र गतीने केल्या.
वर्ष २०११ पासून त्या ऊन-पाऊस, तहान-भूक आदींची तमा न बाळगता लाखो किलोमीटर भ्रमंती करून अध्यात्मप्रसार करत आहेत. भारताचा सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी त्या तीर्थक्षेत्रे, मंदिरे, मठ, ऐतिहासिक ठिकाणे इत्यादी स्थानी जाऊन चित्रीकरण करत आहेत, तसेच तेथील माहिती आणि दुर्मिळ वस्तू यांचा संग्रहही करत आहेत. देवस्थानांचे चित्रीकरण, संत आणि भक्त यांच्या भेटीगाठी आदी सेवांच्या निमित्ताने त्यांची अविश्रांत भ्रमंती चालू आहे. मागील काही वर्षांपासून त्या महर्षींच्या आज्ञेनुसार भारतात, तसेच परदेशातही भ्रमण करत आहेत. सनातनमध्ये क्वचितच असे कुणी असेल, ज्याने एवढ्या विविध प्रकारच्या सेवा एवढ्या कौशल्याने आणि अत्यल्प काळात केल्या असतील ! यातूनच श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे एकमेवाद्वितीयत्व लक्षात येते.
‘प्रीती’ हा श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा स्थायीभाव असून त्या सहजतेने आणि चैतन्यमय वाणीने सर्वांना आपलेसे करून घेतात. त्यांच्या प्रथम भेटीत अपरिचित व्यक्तीही त्यांच्याकडे आकृष्ट होतात आणि त्यांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यातील दैवी शक्ती अन् सामर्थ्य यांची अनुभूती येते. त्यांनी समाजातील अनेक जिज्ञासू, संत आणि धर्माभिमानी यांना सनातनच्या कार्याशी जोडले आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवर अद्धितीय अन् अविरत कार्य चालू आहे. त्यामुळे केवळ ‘साधक आणि सनातन’ एवढ्यापुरतेच त्यांचे कार्य सीमित न रहाता ते विश्वव्यापक बनले आहे. आता त्यांच्या अस्तित्वाने आणि संकल्पानेच कार्य सिद्धीस जात आहे.
‘उत्साही, आनंदी, धर्मकार्याची तळमळ, प्रीती, देवाप्रती भाव’ इत्यादी अनेक दैवी गुणांनी अलंकृत असलेल्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘भक्ती कशी असावी ?’, याचे मूर्तीमंत उदाहरण सर्वांपुढे ठेवले आहे. ‘त्यांच्याकडून असेच कार्य उत्तरोत्तर घडत राहो’, अशी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी भावपूर्ण नमस्कार !
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |