‘अतिथी देवो भव !’ हे ब्रीदवाक्‍य सार्थ करणारा रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम, म्‍हणजे आधुनिक काळातील गुरुकुल !

‘ऑगस्‍ट २०२४ मध्‍ये सनातन संस्‍था आयोजित १० दिवसांच्‍या ‘आध्‍यात्मिक व्‍यक्‍तीमत्त्व विकास’ शिबिरात सहभागी होण्‍यासाठी माझी निवड झाली. त्‍या निमित्ताने मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात रहाण्‍याची आणि आश्रमातील दिनचर्या अनुभवण्‍याची संधी मिळाली. मी आश्रमातील सहजीवन अनुभवत असतांना माझे झालेले चिंतन आणि आलेल्‍या ईश्‍वरीय अनुभूती लिहून देण्‍याचा प्रयत्न करत आहे.   

(भाग १)

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. ठिकठिकाणची मंदिरे पहाण्‍याची आवड असणे; मात्र आश्रमात राहिल्‍यावर तेथील सात्त्विक वातावरण अनुभवल्‍याने गोव्‍यातील मंदिरे पहायची इच्‍छा न होणे

यापूर्वीही मला रामनाथी आश्रमात रहाण्‍याची संधी मिळाली होती; मात्र इतके दिवस सलग रहाण्‍याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. मला फिरण्‍याची आणि ठिकठिकाणची मंदिरे पहाण्‍याची आवड आहे. यापूर्वी मी रामनाथी आश्रमात गेलो असतांना आवडीने गोवा येथील आश्रमाजवळील प्रसिद्ध अशी ४ – ५ मंदिरे पाहिली होती. गोवा येथील मंदिरे ‘स्‍थापत्‍य कला, स्‍वच्‍छता, देवतांची पूजा आणि सजावट’, यांसाठी प्रसिद्ध आहेत. महाराष्‍ट्रातील काही मंदिरांचा अपवाद वगळता महाराष्‍ट्रातील मंदिरांपेक्षा गोव्‍यातील मंदिरांमध्‍ये मला अधिक प्रसन्‍न वाटत असे. रामनाथी आश्रमातून बाहेर पडून मी मंदिरे पाहून आल्‍यावर मात्र माझ्‍या मनाला विशेष असे काही वाटले नव्‍हते. नंतर मी ‘असे का झाले असावे ?’, हा विचार केल्‍यावर माझ्‍या लक्षात आले, ‘हा आश्रमातील सात्त्विकता आणि सकारात्‍मकता यांचा परिणाम आहे.’ त्‍यामुळे या वेळी ‘गोव्‍याला जायचे’, हे ठरल्‍यावर मला तेथील मंदिरे पहायची इच्‍छा झाली नाही. हा मला माझ्‍यात जाणवलेला मोठा पालट आहे.

२. आश्रमात कौशल्‍यपूर्ण केलेले काटेकोर नियोजन

२ अ. आश्रमात येण्‍यापूर्वीच शिबिरात सहभागी होणार्‍या साधकांची सर्व प्राथमिक माहिती ‘ऑनलाईन’ अर्जात भरून घेणे : ‘आश्रमातील शेकडो साधकांच्‍या दैनंदिन सहस्रो सेवांचे वेळापत्रक सांभाळून एवढ्या मोठ्या शिबिराचे आयोजन करणे’, हे फार कौशल्‍याचे काम आहे. साधकांकडून आश्रमातील प्रत्‍येक काम सेवाभावाने केले जाते. सेवा परिपूर्ण होण्‍यासाठी आधी त्‍या सेवांची व्‍याप्‍ती काढली जाते. मला याची जाणीव पुण्‍यातून निघण्‍यापूर्वी आम्‍ही आमची प्राथमिक माहिती ‘ऑनलाईन’ अर्जात लिहिल्‍यावर झाली. ‘आमचे जेवणातील पथ्‍य, उपवास, ‘चहा, कॉफी कि कशाय’ यांपैकी काय अपेक्षित आहे ? झोपण्‍याची सोय, शौचालयाचा प्रकार, तसेच गोवा येथे पोचण्‍याचा दिवस, वेळ, उतरण्‍याचे ठिकाण आणि प्रवासाचे साधन’, अशी सगळी माहिती अर्जात लिहायची होती. मी लिहून दिलेल्‍या पर्यायानुसार सर्व दिवस मला त्‍या सोयी उपलब्‍ध झाल्‍या.

२ अ १. शिबिरासाठी गोवा येथे आल्‍यापासून पुन्‍हा स्‍वस्‍थानी जायला निघेपर्यंत काहीही अडचण न येणे : ‘दुसर्‍याचा विचार करणे, त्‍याच्‍या सोयी विचारून घेणे, त्‍याच्‍या नोंदी ठेवणे आणि त्‍यानुसार सर्व सुविधा पुरवण्‍याचे नियोजन करणे’ इत्‍यादींचे परिणाम एक शिबिरार्थी म्‍हणून मी अनुभवले.

‘शिबिरासाठी गोव्‍यात उतरल्‍यापासून आश्रमात जाणे, १० दिवसांचा निवास आणि पुन्‍हा स्‍वस्‍थानी जायला निघणे’ इत्‍यादी गोष्‍टी करतांना मला काहीही अडचण आली नाही, इतके काटेकोर नियोजन मला पहायला मिळाले.

‘व्‍यवसाय, नोकरी, विविध आस्‍थापने यांत असे प्रयत्न झाले, तर तेथील कर्मचार्‍यांची कार्यक्षमता वाढेल. पर्यायाने तेथील कामे तणावमुक्‍त अन् आनंदी वातावरणात होतील अन् त्‍यांची फलनिष्‍पती निश्‍चितच वाढेल ’, असे माझ्‍या लक्षात आले.

२ आ. निवासाच्‍या ठिकाणी केलेले सुयोग्‍य नियोजन

२ आ १. पलंगाला शिबिरार्थीच्‍या नावाची चिठ्ठी लावलेली असणे : आमच्‍या निवासाच्‍या ठिकाणी शिबिरार्थीच्‍या नावाची चिठ्ठी पलंगाला लावण्‍यात आली होती. यामुळे ‘मी कुठे झोपू ?’, हा प्रश्‍नच आला नाही. आपापले नाव पाहून प्रत्‍येक जण आपला पलंग वापरू लागला. असे केले नसते, तर शिबिरार्थींचा बराच वेळ वाया गेला असता. ‘शिबिरार्थींचा वेळ आणि शक्‍ती वाया जाऊ नये’, यासाठी ही शिस्‍त लावली जात आहे आणि ती आवश्‍यक आहे’, याची मला जाणीव झाली.

२ आ २. पलंग पूर्व -पश्‍चिम दिशेत ठेवलेले असणे : नवीन ठिकाणी दिशा लगेच लक्षात येत नाहीत. निवासाच्‍या ठिकाणी सर्व पलंगांची दिशा ही आधीपासूनच पूर्व-पश्‍चिम अशी ठेवण्‍यात आली होती.     (क्रमशः)

– श्री. अनिकेत विलास शेटे, पिंपरी चिंचवड, पुणे. (८.९.२०२४)

या लेखातील पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/859854.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक