परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या अभ्‍यासवर्गाचे वेगळे स्‍वरूप आणि साधकाला आलेली अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सूक्ष्मातील प्रयोग

‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले पूर्वी घेत असलेल्‍या अभ्‍यासवर्गाचे (फळा-खडू वर्गाप्रमाणे शिकवणे) स्‍वरूप मला ‘भावनेच्‍या आहारी’ आवडले आणि मी प्रत्‍येक वेळी अभ्‍यासवर्गाला गेलो. माझे नामस्‍मरण आणि सेवा तेव्‍हापासूनच चालू आहे. वर्गाच्‍या वेळी ‘अर्क’ असे नामस्‍मरण करतांना कान आणि डोळे गरम होणे, असे सूक्ष्मातील प्रयोग जमायला लागले. स्‍वतः परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ मिळत होतेच अन् व्‍यावहारिक आणि आध्‍यात्मिक अनुभूती येत होत्‍या.

२. सतत नामस्‍मरण किंवा प.पू. भक्‍तराज महाराज यांची भजने स्‍मरत रहाणे आणि अशा स्‍थितीत असतांना एक टँकर एकदम जवळ आल्‍यावर कुणीतरी धक्‍का देऊन बाजूला करणे

‘इयत्ता नववीत असतांना एक दिवस शनिवारी उठल्‍यापासून ते झोपेपर्यंत सतत नामस्‍मरण किंवा प.पू. भक्‍तराज महाराज यांची भजने आठवत होती. शाळा सकाळी ७ ते ११.३० वाजेपर्यंत होती. मी घरी येतांना गोवा-मुंबई महामार्गावरून सायकलवरून येत होतो. डोक्‍यावर टोपी होती.  गोव्‍यावरून एक पेट्रोलचा टँकर माझ्‍या सायकलच्‍या अगदी जवळ आला, तरी माझे लक्ष नव्‍हते; कारण मी तेव्‍हा भजनांच्‍या तंद्रित होतो. टँकर एकदम जवळ आल्‍यावर मला कुणीतरी धक्‍का दिल्‍यासारखे झाले. मी तोल जाऊन डाव्‍या बाजूने तसाच पुढे गेलो. पुष्‍कळ पुढे गेल्‍यावर काहीतरी घडल्‍याचे जाणवले. वळून बघितले, तर टँकरचालक ‘हॉर्न’ वाजवून मला जाणीव करून देत होता. बहुतेक शिव्‍याही देत होता. मी विचार न करता घरी आलो. घरी सर्वांना आणि सत्‍संगात ही घटना सांगितली. नंतर काही दिवसांतच परात्‍पर गुरु डॉक्‍टर आमच्‍या घरी आले. तेव्‍हा त्‍यांना हे सांगितले. ते म्‍हणाले, ‘‘त्‍या दिवशी मी सतत तुझी आठवण काढत होतो.’’

– एक साधक

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक