मंदिर सरकारीकरण झालेले श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, श्री तुळजापूर देवस्थान यांसह महाराष्ट्रातील सरकारीकरण झालेल्या अनेक देवस्थानांमधील गैरव्यवहार, अनियमितता यांविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवण्यात येत आहे. या संदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’चे विशेष प्रतिनिधी श्री. अजय केळकर आणि श्री. प्रीतम नाचणकर हे सातत्याने पंढरपूर येथे जाऊन तेथील प्रश्नांना दैनिकाच्या माध्यमातून वाचा फोडतात. यामुळे तेथील देवस्थानांमधील हे गैरप्रकार सातत्याने समोर आल्याने त्याला चाप बसला आहे.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे प्रत्यक्ष काम पहावयास मिळणे !
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनासाठी ७३ कोटी रुपयांचा आराखडा संमत होऊन याचे काम चालू झाले होते. प्रारंभी हे काम पहाण्यासाठी आम्हाला मंदिरात प्रवेश मिळत नव्हता; मात्र पांडुरंगाच्या कृपेने आम्हाला हे काम चालू असतांना ते जवळून पहाण्याची संधी मिळाली. यामुळे नेमके काम काय चालू आहे ? याची वस्तूस्थिती वारकर्यांसमोर दैनिकाच्या माध्यमातून मांडता आली.
वारकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून प्रशासनास प्रत्यक्ष कृतीप्रवण करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ !
महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय लाखोंच्या संख्येने आहे. हे वारकरी जेव्हा पंढरपूर येथे येतात, तेव्हा त्यांना चंद्रभागा नदीप्रदूषण, दर्शनरांगेत दीर्घकाळ थांबावे लागणे, दर्शन वेळेत न मिळणे यांपासून अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तेथील मठांच्या असलेल्या समस्या, त्यांना येणार्या अडचणी यांविषयी ‘सनातन प्रभात’मधून सातत्याने आवाज उठवण्यात येत आहे. या संदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’चे विशेष प्रतिनिधी श्री. अजय केळकर आणि श्री. प्रीतम नाचणकर हे सातत्याने पंढरपूर येथे जाऊन मंदिर समितीला भेटणे, प्रशासनास भेटणे या संदर्भात सोलापूर येथे पाठपुरावा करणे असे प्रयत्न करतात. तेथे प्रसाद म्हणून देण्यात येणार्या लाडूच्या संदर्भात माहिती घेणे, गोशाळाची पहाणी, भक्त निवासाची वस्तूस्थिती यांसह अनेक गोष्टींमधील सत्यता ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून मांडून त्याला वाचा फोडली. पंढरपूर येथील अनेक मठ-संप्रदाय, वारकर्यांचे प्रमुख यांच्याशी चर्चा करून सातत्याने वारकर्यांचे प्रश्न समजून घेतले. या संदर्भात काही वैशिष्ट्यपूर्ण काम करणारे श्री. अतुल आराध्ये यांच्या सारख्यांच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या. यामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’ हे वारकर्यांना स्वत:चे दैनिक वाटते. या दैनिकाच्या माध्यमातून वारकर्यांचे केवळ प्रश्न मांडले गेले, असे नाही, तर सनातन प्रभातने प्रशासनास कृतीप्रवण केले. या संदर्भात ‘वारकरी संप्रदाय पाईक संघा’चे राष्ट्रीय प्रवक्ते ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर म्हणाले, ‘‘जे काम प्रशासकीय अधिकार्यांचे आहे, ते कार्य दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहरांनी केले. पंढरपूर तीर्थक्षेत्राशी संबंधित असलेल्या अनेक मूलभूत समस्या जाणून घेऊन त्याला वाचा फोडण्याचे काम ‘सनातन प्रभात’ करत आहे. त्यांचे अंत:करणपूर्वक आभार !’’
गेल्या ३८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दागिन्यांचे मूल्यांकन नसल्याविषयी ‘सनातन प्रभात’ने उठवला होता आवाज !
डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरा’चा वर्ष २०२१-२२ चा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात दागिन्यांचे मूल्यांकन झाले नसल्याचे नमूद केले. सर्वप्रथम दैनिक ‘सनातन प्रभात’ने वृत्त देऊन ही गोष्ट उघड केली. यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाने या विषयावर पत्रकार परिषद घेऊन लेखापरीक्षण, तसेच मंदिराच्या विविध अनागोंदी कारभाराविषयी आवाज उठवला होता. गेली ३ वर्षे दैनिक ‘सनातन प्रभात’ने मूल्यांकन झालेले नसल्याविषयीचे सूत्र लावून धरले होते. वर्ष १९८५ मध्ये मंदिराचे सरकारीकरण झाल्यापासून या प्राचीन दागिन्यांचे मूल्यांकन झाले नव्हते. त्यामुळे देवतांच्या प्राचीन दागिन्यांच्या मूल्यांकनाचा प्रश्न जवळपास ३८ वर्षांपासून रखडलेला होता. यानंतर सप्टेंबर २०२४ मध्ये प्राचीन दागिन्यांच्या मूल्यांकनासाठी मूल्यांकनकर्त्याची नियुक्ती करण्यात आली.
दैनिकाच्या पाठपुराव्यानंतर रिक्शाभाडे, तसेच अन्य तक्रारी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाचा स्वतंत्र ‘टोल फ्री’ क्रमांक घोषित !
पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी प्रतिदिन २५ ते ३० सहस्र भाविक दर्शनासाठी येतात. या भाविकांकडून रिक्शाचालक मनमानी पद्धतीने भाडे आकारणी करतात. राज्यातून, तसेच परराज्यातून येणार्या भाविकांचीही लूट होते. रेल्वेस्थानकापासून मंदिराकडे जाण्यासाठी १०० रुपये मागितले जातात. शहरात विविध ठिकाणी उपनगरात जाण्यासाठी नागरिकांनाही या अडचणी येतात. पंढरपूर येथील रिक्शांना भाडेआकारणी करण्यासाठी ‘मीटर’ नसल्याने ही अडचण भेडसावते. या लुटीच्या संदर्भात नेमकी तक्रार कुणाकडे करायची ? हा वारकर्यांना प्रश्न होता. या संदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी पंढरपूर येथे जाऊन वारकरी आणि प्रवासी यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. यानंतर रिक्शाचालकांकडून आकारण्यात येणार्या अवास्तव भाड्याविषयी सोलापूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन प्रादेशिक परिवहन अधिकार्यांची भेट घेऊन त्यांना हा प्रकार लक्षात आणून दिली. त्यानंतर परिवहन विभागाच्या संबंधित अधिकार्यांनी ही माहिती दिली. परिवहन विभागाच्या वतीने ऑक्टोबर २०२४ च्या दुसर्या आठवड्यात यासाठी स्वतंत्र क्रमांक घोषित केला.
दौर्याच्या कालावधीत घडलेल्या अन्य वैशिष्ट्यपूर्ण घटना !
या दौर्याच्या कालावधीत आम्ही वाळूचोरीच्या संदर्भात विविध जणांशी संपर्क साधून माहिती घेत होतो. यासाठी आम्ही प्रांताधिकारी, मुख्याधिकारी, तसेच या संदर्भात कार्य करणार्या विविध सामाजिक संघटना, वारकरी संप्रदाय यांना भेटलो. याचा परिणाम असा झाला की, चंद्रभागा नदीच्या परीसरात आम्ही पत्रकार सातत्याने आहोत, हे लक्षात आल्यावर प्रशासनाने अवैध वाळू उपसा करणारी नाव, तसेच काही वाहने पकडून ती जप्त केली.
केवळ श्री गुरुकृपेमुळेच आम्ही ही सेवा करू शकलो ! ‘शेवटच्या श्वासापर्यंत श्री गुरूंनी दैनिकाची सेवा अव्याहतपणे करून घ्यावी’, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !
– श्री. अजय केळकर, कोल्हापूर