आळंदी (जिल्हा पुणे) – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मोत्सव सप्त शतकोत्तर वर्ष (७५० वे वर्षे) चालू असून त्या निमित्ताने आळंदी देवस्थानच्या वतीने वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच सप्त शतकोत्तर वर्षाचे औचित्य साधून भाविकांना यंदा कार्तिक वारी सोहळ्यात माऊलींच्या रथोत्सवात प्राचीन असलेला १५० वर्षे जुना लाकडी रथ पहाता येणार आहे. २३ फूट उंच आणि अंदाजे १ सहस्र २०० किलो वजन असलेल्या या रथातून माऊलींचा आळंदी शहरातून रथोत्सव पार पडणार आहे. सध्या देवस्थानाकडून रथाची डागडुजी आणि रस्त्यावर चालण्याचा सराव चालू आहे. यामुळे ज्या रथातून रथोत्सव चालू करण्यात आला, अशा मूळ लाकडी रथातून यंदाचा रथोत्सव पहाण्याचे साक्षीदार भाविक ठरणार आहेत. ही अनोखी पर्वणी असून, याचे स्वागत आळंदीसह राज्यभरातील भाविकांकडून होत असल्याचे दिसून येत आहे.
वर्ष १८७३ मध्ये श्री गुरु नरसिंह सरस्वतीस्वामी महाराज आळंदीला आले. वर्ष १८८६ मध्ये त्यांनी आळंदीत समाधी घेतली. आपल्या ११ वर्षांच्या आळंदीतील कार्यकाळात त्यांनी माऊलींच्या वैभवात भर टाकण्यात मोठे योगदान दिले. माऊलींच्या कार्तिकी उत्सवात रथोत्सवासाठी सुरेख नक्षीकाम असलेला शिसम लाकडाचा भव्य रथ त्यांनी बनवला. त्यातून पुढील काही दशके रथोत्सव या रथातून चालू होता; मात्र तत्कालीन रस्त्यांची अवस्था आणि रथाची भव्यता पहाता पुढे देवस्थानने हजेरी श्री मारुति मंदिर चौकात भव्य रथ उभारणी मंडप बांधून त्यात हा रथ अनेक वर्षे ठेवला. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अधिवक्ता राजेंद्र उमाप, पालखी सोहळाप्रमुख, विश्वस्त योगी निरंजन नाथ, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे या नवनियुक्त विश्वस्त मंडळींनी हा रथ यंदाच्या कार्तिकी वारी सोहळ्यात रथोत्सवासाठी बाहेर काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि त्याविषयी सिद्धताही आता चालू झालेली आहे. पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांनी रथ पुन्हा चालू करण्याविषयी संकल्प केला होता.