संबंधितांवर २३८ कोटी ४३ लाख रुपयांची वसुली करण्याचे दायित्व !
सोलापूर – सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नियमबाह्य पद्धतीने कर्जवाटप करून बँकेच्या हानीस उत्तरदायी असलेले तत्कालीन संचालक, अधिकारी आणि कर्मचारी अशा ३५ जणांवर २३८ कोटी ४३ लाख ९९९ रुपयांचे दायित्व निश्चित करण्यात आले आहे. दायित्व निश्चितीसाठी नियुक्त केलेले चौकशी अधिकारी तथा निवृत्त अप्पर निबंधक डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी चौकशीचा अहवाल विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांच्याकडे सादर केला आहे, तसेच या प्रकियेचा खर्च ११ लाख २५ सहस्र रुपयेही माजी संचालक, अधिकारी, कर्मचारी यांच्याकडूनच वसूल केला जाणार आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ठराविक नेत्यांचा अनेक वर्षांपासून सहभाग आहे. बँकेच्या नियमबाह्य पद्धतीने होत असलेल्या कारभाराच्या विरोधात बार्शी मतदारसंघांचे अपक्ष आमदार संजय राऊत हे वर्ष २०११ पासून न्यायालयीन लढाई लढत आहेत. मंत्रालय पातळीवर त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सहकार कायदा कलम ८३ अन्वये चौकशी करण्यात आली. वस्त्रोद्योग उपसंचालक चंद्रकांत टिकुळे यांनी सादर करण्यात आलेल्या चौकशी अहवालात दायित्व निश्चितीची शिफारस करण्यात आली होती. त्याप्रमाणे निवृत्त अप्पर निबंधक डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी दायित्व निश्चिती विभागीय सहनिबंधक यांच्याकडे सादर केली.