उपचारांमध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका !
पिंपरी (पुणे) – २ वर्षांच्या मुलाच्या पायाजवळ ‘वॉर्मर मशीन’ ठेवल्याने गुडघ्याखालील पाय जळल्याने दिरांश गादेवार या बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी चिखली येथील खासगी रुग्णालयातील ३ आधुनिक वैद्यांसह २ परिचारिकांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘ससून रुग्णालया’तील समितीच्या अहवालामध्ये उपचारांमध्ये हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानुसार दोषींवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी मृत बालकाची आई दीपाली गादेवार यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. डॉ. जितेश दोभाळ, डॉ. रजनिश मिश्रा, डॉ. रोहन माळी, परिचारिका रेचल दिवे आणि सविता वरवटे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दिरांश याला सर्दी झाली म्हणून डॉ. दोभाळ यांच्या सल्ल्यानुसार चिखलीतील नेवाळेवस्ती येथील ‘इम्पिरीअल रुग्णालया’त भरती केले होते. त्यांच्यावर उपचार चालू असतांना १८ नोव्हेंबर २०२३ या दिवशी सकाळी ७ वाजता डॉ. मिश्रा, डॉ. रोहन हे दिरांशचा नमुना घेण्यासाठी आले. त्यांनी दीपाली यांना बाहेर थांबण्यास सांगितले. त्यानंतर ८ वाजता दीपाली पुन्हा मुलाजवळ आल्यानंतर दिरांशच्या पायाजवळ ठेवलेल्या ‘वॉर्मर मशीन’मुळे दिरांशचा गुडघ्याखालील पाय पूर्णपणे जळाला. या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले. या प्रकरणातील उपचाराची कागदपत्रे ‘ससून’ येथील तज्ञ आधुनिक वैद्यांच्या समितीकडे पाठवण्यात आली. त्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली.