भारतातील प्रत्येक कोपर्यात दिवाळीचे रंग वेगळेच आहेत. दक्षिण भारतातील विविध राज्यांमध्ये दिवाळी हा सण ‘नरकचतुर्दशी’ म्हणून साजरा केला जातो.
- उत्तर भारतातील दिवाळी ! : उत्तर भारतात १४ वर्षांच्या वनवासानंतर प्रभु श्रीराम दिवाळीच्या दिवशी अयोध्येत परत आले, तेव्हापासून दिवाळी साजरी केली जाते. प्रभु श्रीराम परतल्यावर अयोध्या नगरीतील नागरिकांनी दीप लावून त्यांचे स्वागत केले. उत्तर भारतात लोक अमावास्येला लक्ष्मीपूजन करतात किंवा दिवाळीच्या दिवशी श्री गणेशासमवेत देवी लक्ष्मीची पूजा करतात.
- दक्षिण भारतातील दिवाळी ! : भारताच्या दक्षिणेकडील भागात श्रीकृष्णांचे भक्त अधिक आहेत. ज्या दिवशी भगवान कृष्णाची पत्नी सत्यभामा हिने नरकासुराचा वध करण्यास सांगितले, त्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. नरकचतुर्दशी लक्ष्मीपूजनाच्या एक दिवस आधी येते. येथे हा दिवाळी सणाचा खरा आरंभ मानला जातो. देशाच्या उत्तरेकडील भागांच्या तुलनेत दक्षिण भारतात दिवाळी अल्प साजरी केली जाते.
लोक नवीन कपडे खरेदी करतात. या दिवशी ते मिठाईची देवाणघेवाण करतात आणि त्यांच्या नातेवाइकांना भेट देतात. कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातील अनेक भागांमध्ये दोन्ही दिवशी फटाकेही फोडले जातात.
दोन्ही भागांतील परंपरा, रूढी यांनुसार वेगवेगळ्या दिवसांना महत्त्व असले, तरी शेवटी आनंद महत्त्वाचा ! त्यामुळे दिवाळी अमावास्येला साजरी होवो किंवा दुसर्या दिवशी लोकांनी तो आनंद उपभोगणे, एकमेकांशी आपुलकीने रहाणे महत्त्वाचे !
– पूजा कारंडे-कदम (साभार : दैनिक ‘सकाळ’)