कोल्हापूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी संचलन उत्साहात !

विजयादशमीच्या निमित्ताने निघालेल्या संचलनात सहभागी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक

कोल्हापूर – ‘हिंदू सारा एक’, हाच संघाचा आत्मा आहे. एक राष्ट्र्र म्हणून भारत हे हिंदु राष्ट्र्रच आहे. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे’, हा संघाचा मूलभूत विचार आहे. वर्षातून एकदा या विचाराची व्यापकता समाजासमोर प्रदर्शित होण्याची एक संधी विजयादशमीच्या निमित्ताने होणार्‍या संचलनाच्या माध्यमातून दिसून येते. विजयादशमीच्या निमित्ताने झालेल्या या संचलनात संघाच्या गणवेशात मोठ्या संख्येने स्वयंसेवक सहभागी झाले होते. यात संघाचे विभाग संघचालक प्रतापअप्पा दड्डीकर आणि शहर संघचालक प्रमोद ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

रुईकर कॉलनी मैदानावर स्वयंसेवक शहराच्या विविध भागांतून एकत्र आले. येथे भगव्या ध्वजाला वंदन करून संचलनाला प्रारंभ झाला. रुईकर कॉलनी, गणेश मंदिर, छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, राज गौरव हॉल, महाराजा हॉटेल, मुक्त सैनिक वसाहत, महाडिक वसाहत दत्त मंदिरपासून सरळ रस्त्याने पुन्हा रुईकर मैदानाकडे संचलनाची सांगता झाली. संचलन मार्गावर जागोजागी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भगव्या ध्वजासमोर नतमस्तक होत स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. शहरातील ५०० हून  अधिक स्वयंसेवक संचलनात सहभागी झाले होते. भारतीय वाद्यांचे घोषपथक आणि त्यांनी वाजवलेल्या विविध रचना हे संचलनाचे आकर्षण ठरले. संचलनाला सामाजिक, राजकीय मान्यवर उपस्थित होते.