एस्.टी. महामंडळाचा निर्णय !
मुंबई – राज्य परिवहन महामंडळाने बसस्थानक आणि आगारे यांचा खासगी माध्यमातून पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महामंडळ ‘पीपीपी म्हणजे पब्लिक आणि प्रायव्हेट पार्टनरशिप’ यांद्वारे हा विकास करणार आहे. महामंडळाने निविदा मागवल्या आहेत. या अंतर्गत २५२ आगारांचा विकास होईल.
एस्.टी.च्या जागा खासगी आस्थापनांना भाडेतत्वावर देऊन एस्.टी.ला उत्पन्न मिळावे, यादृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे. एस्.टी. स्थानक आणि आगार येथे विमानतळासारखे वातावरण निर्माण करण्यात येईल, तसेच तेथे खरेदीही करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील १९ बसस्थानके आणि आगारांचा पुनर्विकास करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे.
लोणावळा बसस्थानक, कोल्हापूरातील ताराबाई पार्क (जुनी विभागीय कार्यशाळा) आणि पन्हाळा (खुली जागा), जळगाव शहर बसस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, विभागीय कार्यशाळा आणि मुक्ताईनगर आगार, नगर येथील पारनेर बसस्थानक, लातूर (शिवाजी चौक), बीडचे बसस्थानक, निवासी सदनिका अन् माजलगाव बसस्थानक, नांदेडचे हदगाव बसस्थानक, धाराशिव आणि कळंब बसस्थानक, अकोलाचे रिसोड बसस्थानक अन् वाशिम बसस्थानक, अमरावतीचे चांदूरबाजार, यवतमाळचे पुसद बसस्थानक, भंडाराचे बसस्थानक, नागपूरचे हिंगणा बसस्थानक, ठाण्याचे वाडा आगार यांचा पुनर्विकास होणार आहे.