पुणे – पुणे जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर सशुल्क वाहनतळ सुविधा चालू झाली आहे. या ठेकेदाराने वाहन चालकांकडून दुप्पट वसुली चालू केल्याने मेट्रोच्या तिकिटापेक्षा वाहन तळ महाग असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. त्यामुळे ‘महामेट्रो’ने या ठेकेदाराचे कंत्राट रहित केले आहे. या ठिकाणी दुचाकी वाहनासाठी १ घंट्याला ८ रुपये आणि २ घंट्यांना १२ रुपये असे शुल्क आकारण्यात येते. याचसमवेत शिरस्त्राण ठेवण्यासाठी ५ रुपये शुल्क आकारण्यात येते; मात्र जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकातील वाहन ठेकेदारांनी दुचाकीसाठी घंट्याला १५ रुपये शुल्क आणि मोटारीसाठी घंट्याला ३५ रुपये शुल्क आकारले. त्यामुळे मेट्रोच्या तिकिटाचा किमान दर १० रुपये आणि वाहनतळ शुल्काचा दर त्यापेक्षा अधिक असल्याचे सूत्र प्रवाशांनी उपस्थित केले. त्यामुळे ‘महामेट्रो’ने संबंधित ठेकेदाराचे कंत्राट रहित केले आहे, असे महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.