मराठवाड्यात ४६ पैकी ३० जागा मिळवण्याचा दावा !
नागपूर – गुर्जर, पटेल, ठाकूर यांच्या आरक्षणाचे आंदोलन आपण यापूर्वी चांगल्या प्रकारे हाताळले, तसेच मराठा आंदोलनही हाताळून विजय मिळवू, असा विश्वास भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २४ सप्टेंबर या दिवशी येथे घेतलेल्या बैठकीत पदाधिकार्यांमध्ये निर्माण केला. मराठवाड्यात विधानसभेच्या ४६ पैकी ३० जागा मिळवण्याचा दावा त्यांनी केला आहे.
२ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीची सूत्रे भाजपचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत: हाती घेतली आहेत. ज्या विदर्भ आणि मराठवाड्यात लोकसभेत मोठा फटका बसला, त्याच भूमीची विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी शहा यांनी निवड केली. विदर्भात १० जागांपैकी महायुतीचे केवळ ३, तर मराठवाड्यात ८ पैकी केवळ एकच खासदार निवडून आला. मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा, तर विदर्भात भाजपविरोधी रोष असल्याने हे अपयश आले.