UP Nameplates Mandatory On Food Shops : उत्तरप्रदेशातील प्रत्येक खाद्यपदार्थाच्या दुकानावर मालकाचे नाव लिहिणे बंधनकारक !

  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अभिनंदनीय निर्णय

  • सीसीटीव्ही बसवणे आणि कर्मचार्‍यांनी मास्क आणि हातमोजे घालणे बंधनकारक

  • दुकाने, ढाबे, हॉटेल आणि रेस्टॉरंट यांच्या चौकशीचाही आदेश

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील सर्व खाद्यपदार्थांची दुकाने, ढाबे, हॉटेल आणि रेस्टॉरंट यांवर आता मालक अन् व्यवस्थापक यांचे नाव लिहिणे बंधनकारक असणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मानवी टाकाऊ पदार्थांसह (थुंकी, मूत्र आदी) अन्य घाणेरड्या पदार्थांची अन्नपदार्थात भेसळ करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. नुकत्याच समोर आलेल्या विविध घटनांच्या पार्श्‍वभूमीवर हा आदेश देण्यात आला आहे.

१. येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व हॉटेल्स, ढाबे, रेस्टॉरंट इत्यादी संबंधित आस्थापनांची, तसेच तेथील प्रत्येक कर्मचार्‍याची चौकशी आणि पडताळणी करण्याचाही आदेश दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेची काळजी घेत आवश्यकतेनुसार नियमांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

२. ‘ज्यूस, डाळी आणि ब्रेड यांसारख्या खाद्यपदार्थांमध्ये मानवी टाकावू पदार्थ मिसळणे घृणास्पद असून ते मान्य नाही’, असे मुख्यमंत्री योगी यांनी स्पष्ट केले. खाद्यपदार्थांची शुद्धता आणि पावित्र्य सुनिश्‍चित करण्यासाठी ‘अन्न सुरक्षा अन् मानके’ या कायद्यात आवश्यक सुधारणा करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत.

३. हॉटेल्स, ढाबे, रेस्टॉरंट इत्यादी भोजन केंद्रांवर संचालक, मालक, व्यवस्थापक आदींचे नाव आणि पत्ता प्रदर्शित करणे बंधनकारक असेल. स्वयंपाकी असो वा वेटर, प्रत्येकाला मास्क आणि हातमोजे घालावे लागतील. येथे सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक असणार आहे.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असा निर्णय घेऊ शकतात, तर अन्य राज्यांचे मुख्यमंत्री का घेऊ शकत नाहीत ? त्यांना जनतेच्या आरोग्याची काळजी नाही का ?