Maoists : पोलिसांचे खबरी समजून नक्षलवाद्यांनी २ गावकर्‍यांना फासावर लटकवले 

छत्तीसगडमधील संतापजनक घटना

(खबरी म्‍हणजे माहिती देणारा)

बिजापूर (छत्तीसगड) – जिल्‍ह्यातील एका दुर्गम गावात नक्षलवाद्यांनी २ गावकर्‍यांना पोलिसांचे खबरी (खबरी म्‍हणजे पोलिसांना माहिती पुरवणारे) असल्‍याच्‍या संशयातून फाशी दिली. नक्षलवाद्यांनी नुकतेच जप्‍पेमार्का गावातून एका शालेय विद्यार्थ्‍यासह ३ गावकर्‍यांचे अपहरण केले होते. त्‍यानंतर ‘जन अदालत’ आयोजित करून दोघांना झाडावर लटकवण्‍यात आले. (भारतीय न्‍यायव्‍यवस्‍थेला समांतर अशी नक्षलवाद्यांची समांतर जनअदालत भरवली जाते, हे लज्‍जास्‍पद ! – संपादक) तसेच शालेय विद्यार्थ्‍याला सोडून देण्‍यात आले. पोलिसांचे एक विशेष पथक यासंदर्भात अन्‍वेषण करत आहे, अशी माहिती एका वरिष्‍ठ पोलीस अधिकार्‍याने दिली आहे.

माओवाद्यांच्‍या भैरमगड क्षेत्र समितीने या हत्‍येचे दायित्‍व स्‍वीकारले आहे. फाशी दिलेले दोघेही ‘पोलिसांचे खबरी’ म्‍हणून काम करत असल्‍याचा दावा त्‍यांनी केला आहे.

४ नक्षलवादी शरण !

छत्तीसगडच्‍या कांकेर जिल्‍ह्यात हिंसाचाराच्‍या अनेक घटनांमध्‍ये सहभागी असलेल्‍या आणि १२ लाखांचे सामूहिक बक्षीस असलेल्‍या ४ नक्षलवाद्यांनी सुरक्षादलांसमोर शरणागती पत्‍करल्‍याचे पोलिसांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

भारतात नक्षलवाद कधी संपुष्‍टात येणार ?