फलकनिर्मिती करणार्यांवरच धडक कारवाई !
नवी मुंबई, १२ सप्टेंबर (वार्ता.) – शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या विज्ञापनांचे अनधिकृत फलक (बॅनर) मोठ्या प्रमाणात लागले आहेत. त्यामुळे महापालिकेची अनुमती नसतांना कोणत्याही विज्ञापनांचे फलक छापणार्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे आदेश नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार मागील काही दिवसांमध्ये २२ हून अधिक प्रिंटर्सना (फलक छापणारे दुकानदार) कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यातील काही प्रिंटर्सवर कारवाई करून दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. तुर्भे विभाग अधिकारी भरत धांडे यांनी १० सप्टेंबरला २ प्रिंटरवर कारवाई करून ५० सहस्र रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मागील काही दिवसांपासून विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी, तसेच अन्य खासगी आस्थापनांनी महापालिकेची कोणतीही अनुमती न घेता शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फलक लावले आहेत. यामुळे शहराचे विद्रूपीकरण झाले आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याची गंभीर नोंद घेत अवैध होर्डिंग छापण्यावर प्रतिबंध घालण्याचा आदेश दिला आहे. सर्व विभाग अधिकार्यांनी त्यांच्या क्षेत्रातील होर्डिंग, बॅनर यांची छपाई करणार्याना नोटीस बजावली आहे.
या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला, चौकामध्ये, झाडांवर इत्यादी ठिकाणी विनाअनुमती जाहिरातींचे बॅनर्स, पोस्टर्स लावण्यात येतात. त्यात समाज माध्यमांद्वारे, तसेच लोकप्रतिनिधींकडून, सामाजिक कार्यकर्ते आणि सजग नागरिक यांच्याकडून विभाग कार्यालयात वारंवार तक्रारी प्राप्त होत असतात. नवी मुंबई महानगरपालिका ही स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत प्रथम नामांकित असून शहर स्वच्छ आणि सुशोभिकरणाच्या दृष्टीकोनातून महानगरपालिकेचे दायित्व आहे. या फलकांमुळे शहराच्या सौंदर्याला हानी पोचत आहेत. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेची अनुमती असल्याविना कोणत्याही प्रकारचे बॅनर छापू नये. विनाअनुमती बॅनर छापल्यास महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम १९९५ चे कलम ३ नुसार आपणांवर कारवाई करण्यात येईल.